Asaduddin Owaisi Attack: असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणारे अटकेत, पोलिसांच्या चौकशीत सांगितले हल्ल्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:00 AM2022-02-04T11:00:25+5:302022-02-04T11:01:51+5:30
Asaduddin Owaisi Attack: हल्ल्यानंतर AIMIM प्रमुखांनी ट्विट करुन हल्ला झाल्याची माहिती दिली आणि कारवरील बुलेट होलचे फोटोही शेअर केले.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) प्रचारासाठी आलेल्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर गुरुवारी दोन जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यातील दोन्ही आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांच्या चौकशीत त्यांनी या हल्ल्यामागचे कारण सांगितले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करुन दिल्लीला परतत असताना पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूरजवळील टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गोळीबारानंतर हल्लेखोर शस्त्रे सोडून पळून गेले. या हल्ल्यानंतर ओवेसींनी स्वतः आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, सचिन आणि शुभम अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
हे आहे हल्ल्याचे कारण
दरम्यान, दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत या हल्ल्यामागचे कारण सांगितले आहे. हापूरचे एसपी दीपक भुकर म्हणाले की, आरोपी ओवेसींच्या भाषणांनी आणि वक्तव्यांनी संतापले होते. यामुळेच त्यांनी ओवेसींवर हल्ला करण्याचा कट रचला. कितापूर, मेरठ येथून प्रचार आटोपून दिल्लीला परतत असताना छाजरसी टोल प्लाझाजवळ या दोघांनी ओवेसींच्या वाहनावर गोळीबार केला.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
कारवर बुलेट होल
हल्ल्यानंतर, AIMIM प्रमुखांनी ट्विट करुन हल्ला झाल्याची माहिती दिली. तसेच, कारवरील बुलेट होलचे फोटोही शेअर केले. ट्विटमध्ये त्यांनी 3-4 लोकांनी हल्ला केल्याचे सांगितले. ओवेसींनी ट्विट केलेल्या छायाचित्रांमध्ये त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या कारवर गोळ्यांचे छिद्र दिसत आहेत. तर, एक गोळी गाडीच्या टायरला लागल्याने कार पंक्चर झाली. यानंतर ओवेसी दुसऱ्या कारमध्ये बसून दिल्लीकडे रवाना झाले.