अमित शहा त्यांचं फारशी नाव कधी बदलणार?; ओवेसींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:44 PM2018-11-12T12:44:27+5:302018-11-12T12:45:51+5:30
नामांतराचा सपाटा लावणाऱ्या भाजपावर निशाणा
हैदराबाद : उत्तर प्रदेशातील विविध शहरांची नावं बदलणाऱ्या भाजपावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा स्वत:चं नाव कधी बदलणार, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. शहा या शब्दाचं मूळ इराणी भाषेतील आहे. त्यामुळे देशातील जिल्हे आणि शहरांच्या नामांतराचा सपाटा लावणाऱ्या भाजपानं आधी स्वत:च्या अध्यक्षांचं नाव बदलावं, असं रविवारी इतिहासकार इरफान हबीब यांनी म्हटलं होतं. यावरुन ओवेसी यांनी शहांना लक्ष्य केलं.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणांची नावं बदलली आहेत. यावरुन ओवेसींनी भाजपाला लक्ष्य केलं. 'उत्तर प्रदेशातील शहरांची नावं बदलली जात आहेत. अलाहाबादचं नाव बदलण्यात आलं आहे. फैजाबादचंही नामांतर करण्यात आलं आहे. आता अमित शहा स्वत:चं नाव कधी बदलणार? कारण शाह हा शब्द फारशी भाषेतून आला आहे,' असं ओवेसी एका जनसभेला संबोधित करताना म्हणाले.
ज्येष्ठ इतिहासकार इरफान हबीब यांनी रविवारी नामांतराच्या मुद्यावर भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी अमित शहांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. 'भाजपा अध्यक्षांचं आडनाव शाह आहे. हा शब्द फारशी भाषेतून आला आहे. तो गुजराती नाही. त्यामुळे आधी भाजपानं स्वत:च्या अध्यक्षांचं नामांतर करावं. त्यावर लक्ष केंद्रीत करावं,' असं हबीब म्हणाले. यापुढे जाऊन त्यांनी गुजरातचं नाव बदलण्याचाही सल्ला दिला. 'गुजरात शब्दाचं मूळदेखील इराणी आहे. पूर्वी गुजरातला गुजरातरा म्हटलं जायचं. त्यामुळे या राज्याचं नावदेखील बदलण्यात यावं,' असं हबीब यांनी म्हटलं होतं.