माझी जिनाशी तुलना करणं चुकीचं, मी कधीच देश तोडायची भाषा केली नाही - ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 12:33 PM2018-08-10T12:33:26+5:302018-08-10T12:49:02+5:30
वादग्रस्त विधान करण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नवी दिल्ली - वादग्रस्त विधान करण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जिना यांच्याशी माझी तुलना करणं चुकीचं आहे. मी कधीही देश तोडण्याची भाषा केली नाही, असं ओवैसी म्हणाले आहेत. तसेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठात जिनांच्या उभारलेल्या पुतळ्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या थर्ड डिग्री या कार्यक्रमात ओवैसींनी हे विधान केलं आहे.
मोहम्मद अली जिना यांच्याशी तुलना केल्यावर ओवैसींनी त्याला आक्षेप घेतला. मी देशाच्या संविधानाचा नेहमीच आदर करत आलो असून, कधीच देश तोडण्याची भाषा केली नाही. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातूनही जिनाचा पुतळा हटवला पाहिजे. त्याच्याशी आमचं काहीही देणं-घेणं नाही. मी नेहमीच संविधान आणि देशाच्या बाजूने उभा राहिलो आहे, असंही ओवैसी म्हणाले आहेत. मी कधीच मुस्लिम राजकारण करत नाही. जे लोक पीडित आहेत त्यांच्या विकासासाठी आम्ही सतत कार्यरत असतो. केवळ त्यांना विकासाचं आश्वासन देऊन काही लोक मतांचं राजकारण करतात असंही ओवैसींनी म्हटलं आहे.