“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा, ज्यांना फक्त कौतुक ऐकायचे असते; सत्य आणि टीका नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:47 PM2022-01-04T14:47:49+5:302022-01-04T14:48:29+5:30
वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कटू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी आशा आहे.
नवी दिल्ली: शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाला. ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला, असे खळबळजनक विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. यातच आता एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही टीका केली असून, पंतप्रधान मोदी असे हुकुमशाह आहेत, ज्यांना सत्य आणि टीका ऐकायची नसते, असे म्हटले आहे.
सत्यपाल मलिक एका राज्यपाल आहेत. केंद्र सरकराने मलिकांची नियुक्ती केली आहे. इतकेच नव्हे तर ते एका घटनात्मक पदावर आहेत. मी काय सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण किमान राज्यपाल काय सांगतात, त्यावर तरी विश्वास ठेवा. राज्यपाल स्वत: सांगत आहेत की पंतप्रधान सत्य ऐकायला तयार नव्हते, असे ओवेसी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
...त्यांना सत्य आणि टीका ऐकायची नसते
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधानांना सांगितले की शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान तुमच्यामुळे शेतकरी मरण पावले, तेव्हा पंतप्रधान संतप्त झाले. यावरून हे सिद्ध होते की पंतप्रधान सत्य स्वीकारायला तयार नाहीत. यातून पंतप्रधानांचा अहंकार दिसून येतो. ते असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त कौतुक ऐकायचे आहे. ज्याला सत्य आणि टीका ऐकायची नसते, या शब्दांत ओवेसी यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये राजकीय फटका बसू शकतो, असे त्यांना वाटले. म्हणूनच केंद्राने कृषी कायदे मागे घेतले. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे राजकीय नाईलाजानेच त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कटू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी मला आशा आहे, असे ओवेसी म्हणाले.