...तर मग मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 03:06 PM2017-11-22T15:06:34+5:302017-11-22T17:25:29+5:30
'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत', असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी बोलले आहेत.
हैदराबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीआधी पाटीदार नेता हार्दिक पटेलने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हार्दिक पटेलच्या भूमिकेवर टीका करत मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ओवेसी यांनी ट्विट केलं आहे की, 'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत'. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिमांसाठी स्टॉकहोम सिंड्रोमसारखी परिस्थिती झाल्याचाही उल्लेख केला.
हार्दिक पटेलची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर असदुद्दीन ओवेसी बोलले की, 'हार्दिक पटेलने सांगितलं की, काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागासलेल्या मुस्लिमांसाठी नाही. याचे अनेक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. पण मुस्लिम राजकीयदृष्या मजबूत नाहीये, आणि दुबळ्या लोकांना शांत बसायला सांगितलं जातं'.
असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांसाठी स्टॉकहोम सिंड्रोमचाही उल्लेख केला. स्टॉकहोम सिंड्रोम अशी परिस्थिती असते, जेव्हा अपहरण झालेल्या व्यक्तीला आपल्या अपहरणकर्त्यासंबंधी सहानुभूती वाटू लागते. इथे स्टॉकहोम सिंड्रोम परिस्थिती म्हणजे इतकी वर्ष फसवणूक होऊनही मुस्लिम धर्मनिरपेक्ष पक्षांनाच मतदान करतात असं त्यांना म्हणायचं आहे.
पाटीदार समाजाला आरक्षण देण्यावरुन काँग्रेसने सादर केलेला फॉर्म्यूला आपल्याला मान्य असल्याचं पाटीदार नेता हार्दिक पटेलने सांगितलं आहे. अहमदाबादमध्ये हार्दिक पटेलने पत्रकारांशी संवाद साधला. 'भाजपाने अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला असून, आमच्या कार्यकर्त्यांना 50 लाखांचं अमिष दाखवलं. आमच्याविरोधात भाजपाने 200 कोटी खर्च केले', असा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. 'भाजपा गेल्या दोन दशकापासून राज्यात सत्तेत असून, त्यांच्याविरोधात लढाई लढणं गरजेचं आहे', असंही हार्दिक पटेल बोलला आहे.
हार्दिक पटेलने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन काँग्रेससोबत कोणतीही वाटाघाटी केलेली नाही. पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. पाटीदारांसाठी तिकीट मागितलेलं नाही. आमच्या कार्यकर्त्यांना 50-50 लाख रुपये देऊन अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे'.