Asaduddin Owaisi, Hijab: "एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल"; ओवेसींचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 08:15 PM2022-10-14T20:15:35+5:302022-10-14T20:16:57+5:30
अल्लाहने कुराणमध्ये आदेश दिल्यानेच मुस्लीम महिला हिजाब घालतात, असेही ते म्हणाले
Asaduddin Owaisi, Hijab: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या पू्र्वजांनी बलिदान दिले आहे. आज त्याच भारतात आमच्या मुलींना विचारले जाते की तुम्ही हिजाब का घालता? पण मी हे नक्की सांगतो की, आज नाही तर उद्या, हिजाब घातलेली एक मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान नक्कीच होईल.
हिजाब बंदीवर सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या निर्णयानंतर गुरुवारी एका जाहीर सभेला ओवेसींनी संबोधित केले. तेव्हा त्यांना महत्त्वाचे आणि मोठे विधान केले. "मी हे आधीही सांगितले आहे आणि आजही सांगतो आहे की हिसाब घातलेली मुस्लीम महिला एक ना एक दिवस भारताची पंतप्रधान होईल. पण मी असे बोलल्यावर अनेकांच्या पोटात दुखते, हृदयात वेदना होतात, रात्री झोप येत नाही. मला एक समजत नाही की जेव्हा मी म्हणालो की मी असताना किंवा मी नसतानाही, जर देशाचा पंतप्रधान हिजाब घातलेली एक मुस्लीम महिला होत असेल तर हे माझे स्वप्न आहे, याचे लोकांना का वाईट वाटावे?", असे ओवेसी म्हणाले.
"अल्लाहने कुराणमध्ये आदेश दिल्याने मुस्लीम महिला हिजाब घालतात. भारतीय राज्यघटनेनुसार हिजाब निवडण्याचा अधिकार आहे, ती निवड वैयक्तिक आहे, प्रत्येकाला संस्कृतीचा अधिकार आहे आणि तो संस्कृतीचा एक भाग आहे. आमच्या मुलीने डोक्यावर कोणतेही कापड घातले तर याचा अर्थ असा होत नाही की तिचा तिने मेंदू झाकून टाकला आहे. हिंदू, शीख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना त्यांच्या धार्मिक पोशाखात वर्गात प्रवेश दिला जातो आणि मुस्लिम विद्यार्थ्याला अडवले जाते. अशा वेळी मुस्लीम विद्यार्थिनींबद्दल तुमची मानसिकता काय हे स्पष्ट होतं. साहजिकच अशा मानसिकतेच्या लोकांना मुस्लीम म्हणजे आपल्यापेक्षा कमी दर्जाचे वाटतात", असा खरमरीत आरोप ओवेसींनी केला.