ओवेसींची खासदारकी रद्द होणार? पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 08:57 AM2024-06-26T08:57:07+5:302024-06-26T09:00:48+5:30

Asaduddin Owaisi oath taking controversy: हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला.

Asaduddin Owaisi oath taking controversy over Palestine Support complaint filed president Draupadi Murmu | ओवेसींची खासदारकी रद्द होणार? पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार

ओवेसींची खासदारकी रद्द होणार? पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार

Asaduddin Owaisi oath taking controversy: हैदराबादचे लोकसभा खासदार आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून काल संसदेत शपथ घेतली. त्यांनी शपथविधी सोहळ्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यानंतर वाद निर्माण झाला. यावर ओवेसी यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. पण आता त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट केले की, हरि शंकर जैन यांनी भारतीय संविधानाच्या कलम १०२ आणि १०३ अंतर्गत असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. ओवेसींच्या घोषणाबाजीनंतर संसदेत गदारोळ झाला.

एनडीएच्या खासदारांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर खुर्चीत बसलेल्या राधामोहन सिंह यांनी ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले. तेव्हाच सदनात शांतता होती. त्यावर ओवेसी यांच्या विधानावर भाजपाने आक्षेप घेत म्हटले की, विद्यमान नियमांनुसार त्यांना संसदेतून अपात्र ठरवण्याची कारणे आहेत. कलम १०२ चा हवाला देत भाजपाने म्हटले आहे की ओवेसी यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. 

वाद वाढल्यानंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मी सभागृहात काहीही चुकीचे बोललो नाही. मी घटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही. शपथविधीदरम्यान 'जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला. पॅलेस्टाईनचा मुद्दा भारतासाठी नवीन नाही, असेही ते म्हणाले. पण त्यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे.

असदुद्दीन ओवेसींचे स्पष्टीकरण काय?

ओवेसी म्हणाले की, बरेच जण, बरेच काही बोलत आहेत. मी म्हणालो- जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फिलिस्तीन. हे घटनेच्या विरोधात कसे काय असेल? संविधानात अशी तरतूद दाखवा. नेहमी आपलेच खरे म्हणता येणार नाही. दुसरे काय म्हणतात हेही आपण एकदा ऐकून घ्यायला हवे. मला जे बोलायचे होते, ते मी बोललो, असेही ते म्हणाले.

Web Title: Asaduddin Owaisi oath taking controversy over Palestine Support complaint filed president Draupadi Murmu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.