Doda Terrorist Attack : असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर निशाणा, काश्मीरच्या डीजीपींना भाजपमध्ये सामील होण्याचा दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:54 PM2024-07-16T16:54:30+5:302024-07-16T17:02:33+5:30
Doda Terrorist Attack : डोडा नियंत्रण रेषेपासून म्हणजेच एलओसीपासून दूर आहे, मग दहशतवादी डोडामध्ये कसे घुसले? असा सवाल करत ही गंभीर समस्या असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यावरून एआयएमआयएमचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. डोडा नियंत्रण रेषेपासून म्हणजेच एलओसीपासून दूर आहे, मग दहशतवादी डोडामध्ये कसे घुसले? असा सवाल करत ही गंभीर समस्या असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि गुप्तचर संस्थांवर हल्लाबोल करत असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, २०२१ पासून जम्मूला लक्ष्य केले जात आहे. तुमचे नेटवर्क काय करत आहे? तुमचे माहिती देणारे काय करत आहेत? पंतप्रधान सांगतात की, कलम ३७० हटवल्यानंतर सर्व काही संपले आहे. पण तसे काही नाही आहे. हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
#WATCH | On 4 Army soldiers killed in Doda encounter, AIMIM Chief Asaduddin Owaisi says, "PM Modi used to say 'Ghar mein ghus kar marenge'. What is this then? This is a failure of the government. They are unable to control terrorism. Whatever has happened in Doda is very… pic.twitter.com/EVkd9CiekR
— ANI (@ANI) July 16, 2024
याचबरोबर, डोडा दहशतवादी हल्ला हे सरकार आणि गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरच्या डीजीपींवरही हल्लाबोल केला. डीजीपींनी सरकारच्या प्रवक्त्यासारखे बोलू नये, नाहीतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा शब्दात असदुद्दीन ओवेसी यांनी डीजीपींवरही निशाणा साधला.
दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने सुरक्षा दलांना हे दहशतवादी लक्ष्य करत आहेत. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत कॅप्टन ब्रिजेश थापा, नाईक डी राजेश, कॉन्स्टेबल बिजेंद्र आणि कॉन्स्टेबल अजय शहीद झाले. गेल्या तीन आठवड्यांत डोडा जिल्ह्यातील जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेली ही तिसरी मोठी चकमक आहे.