Asaduddin owaisi : असदुद्दीन ओवेसींनी मंगळसूत्र आणि कुंकवाशी केली हिजाबची तुलना, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:42 PM2022-10-13T19:42:20+5:302022-10-13T19:43:17+5:30
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भाजपने विनाकारणच हा मुद्दा बनवला आहे. खरे तर हा मुलींच्या पसंतीचा मुद्दा आहे.
हिजाबवरील बंदीच्या मुद्द्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांचे एकमत न झाल्याने आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठविण्यात येणार आहे. यातच हिजाबवरून आता पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. आम्हाला आशा होती, की सर्वोच्च न्यायालयाकडून एकमताने हिजाबच्या बाजूने निर्णय येईल. मात्र, न्यायाधिशांचे एकमत होऊ शकले नाही, आम्ही याचा आदर करतो. जस्टिस धूलिया म्हणाले, की चॉइस एक मोठी गोष्ट आहे आणि याचा सन्मान व्हायला हवा. त्यांनी आर्टिकल 14 आणि 19 चा उल्लेख करत त्यांनी आपला निर्णय लिहिला आहे.
मंगळसूत्र, कुंकू आणि पगडीशी केली हिजाबची तुलना -
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भाजपने विनाकारणच हा मुद्दा बनवला आहे. खरे तर हा मुलींच्या पसंतीचा मुद्दा आहे. ओवेसी यांनी एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना हिजाबची तुलना पगडी, कुंकू आणि मंगळसूत्रासोबत केली. "जर आपण युनिफॉर्ममध्ये एखाद्या शिख मुलाला पगडीची परवानगी देता आणि हिंदू मुलीला कुंकू लावायची आणि मंगळसूत्राची परवानगी देता, पण मुस्लीम मुलींना हिजाबची परवानगी मिळत नसेल तर हा भेदभाव आहे," असे ओवेसींनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर जर मुलांनी एकमेकांची धार्मीक परंपरा बघितली नाही, तर ते विविधत कशी समजू शकतील. मुलांना शाळेतच सर्व परंपरा समजायला हव्यात, असेही ते म्हणाले.
"कुराणात अल्लाहचा आदेश आहे हिजाब" -
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य आहे. अल्लाह आणि कुराणाने हिजाब आणि निकाब आदेश म्हटले आहे. जर एखाद्याला हिजाब परिधान करायचा नसेल तर ती व्यक्ती तसे करू शकते. मात्र, जर कुणाची इच्छा असेल, त्याला परिधान करू द्यायला हवा. मुलींनी हिजाब परिधान करावा, असा आदेश अल्लाहने कुराणात दिला आहे, असेही ओवेसी यावेळी म्हणाले.