मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 05:15 PM2024-03-04T17:15:08+5:302024-03-04T17:18:24+5:30

ओवेसी यांनी महाविकास आघाडीलाही दाखवून दिली चूक, सुनावले खडेबोल

Asaduddin Owaisi reveals plan to counter Pm Modi Hindu Nationalism vs Indian Nationalism also criticizes Mahavikas Aghadi | मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन'

मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन'

Asaduddin Owaisi vs Pm Modi: पंतप्रधान मोदी यांची विचारधारा हिंदू राष्ट्रवादाची (Hindu Nationalism) आहे. त्यांच्यासमोर जर टिकून राहायचे असेल तर भारतीय राष्ट्रवादाचा (Indian Nationalism) मुद्दा घेऊन आम्ही जनतेत जाऊ. आपल्या स्वातंत्र्यसेनानींनी देशाला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सोडवले कारण त्यांना अपेक्षा होती की हा देश 'भारतीय राष्ट्रवादा'च्या मुद्द्यावर आगेकूच करत राहील. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. मोदीजी म्हणतात की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. पण खरे पाहता त्यांनी भारतीय राजकारणातून मुस्लीम घटकाला बाजूला करण्याची सुरुवात केलीय, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीसाठीचा 'प्लॅन' सांगितला.

"मोदीजी अशा लोकांची साथ देत आहेत जे व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्या फायद्याचे आहेत. मोदीजी म्हणतात की ते एका विशिष्ट समाजातून पुढे आले आहेत आणि त्यांनी चहा विकला आहे. जी गोष्ट खरी आहे यात वादच नाही पण ते आता ज्याप्रकारे देश चालवत आहेत ते पाहता ही विचारधारेची लढाई ठरणार आहे," असे ते एबीपीमाझाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. "मुस्लीम मुद्द्यांवर मोदींना प्रश्न विचारला की ते सबका साथ सबका विकास म्हणतात पण खरे पाहता तसे काहीच घडत नाही. भारतीय राष्ट्रवाद ही एक विचारधारा आहे. या विचारधारेमध्ये सर्व घटकांचा समावेश केला जातो. यातून कोणालाही वगळले जाऊ शकत नाही. आम्ही सर्व प्रकारच्या विषयांवर बोलतो. पण पंतप्रधान मोदी यांची सध्याची रणनीति पाहता ते हिंदू राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करत आहेत," असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले.

सत्ताधारी सध्या भक्कमपणे आगेकूच करताना दिसत आहेत. अशा वेळी विरोधकांना जर निवडणुकीत आपली छाप पाडायची असेल तर विचारधारेशी प्रामाणिक राहावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेशी हातमिळवणी करून बसले. उद्धव ठाकरे विधानसभेत सांगत होते की आमच्या शिवसैनिकांनी मशीद तोडली, त्यावेळी बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकच बसले होते, पण ते काहीही बोलले नाहीत. जर तुम्ही तुमच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून निवडणुकांना सामोरे गेलात तर तुम्हाला नक्कीच तुमची छाप पाडत येईल आणि चांगली कामगिरी करता येईल. तुम्ही आधीच तुमच्या विचारधारेशी तडजोड करून बसला आहात आणि सत्तेत जाण्याची स्वप्न बघत आहात, अशा वेळी निवडणुकीत तुम्हाला यश मिळणे कठीणच आहे, अशा शब्दांत ओवेसींनी महाविकास आघाडीवर टोलेबाजी केली.

Web Title: Asaduddin Owaisi reveals plan to counter Pm Modi Hindu Nationalism vs Indian Nationalism also criticizes Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.