'RSSचा छोटा रिचार्ज...'; ओवेसींनी 'आप'वर डागली तोफ; नव्या निर्णयावरून हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 02:40 PM2024-01-16T14:40:40+5:302024-01-16T14:42:58+5:30
'आप'ने घेतलेल्या एका निर्णयावरून सुरू झाला नवा वाद
AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आम आदमी पक्षावर (आप) निशाणा साधत त्यांना आरएसएसचा छोटासा रिचार्ज म्हटले आहे. त्यांनी 'आप'च्या सुंदरकांडच्या ताज्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मंगळवारी दिल्लीतील सर्व ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये सुंदरकांड पाठ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा ओवेसी यांनी केला आहे.
सुंदरकांड आयोजित करण्याच्या 'आप'च्या ताज्या निर्णयानंतर ओवेसी संतापले. या निर्णयाबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर संताप व्यक्त केला. ते म्हणाले- आरएसएसच्या छोट्या रिचार्जने ठरवले आहे की दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सुंदरकांड पाठाचे आयोजन केले जाईल. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असल्याने निर्णय घेण्यात आला आहे.
पुढे बिल्किस बानो केसचा उल्लेख करत ओवेसींनी आठवण करून दिली की हे तेच लोक आहेत ज्यांनी त्या मुद्द्यावर मौन पाळले होते. त्यांना फक्त शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर बोलायचे आहे. सुंदरकांड पाठ हे आरोग्याची निगडित आहे की शिक्षणाशी संबंधित आहे? त्यांचा खरा चेहरा असा आहे की त्यांना लोकांना न्याय मिळू द्यायचा नाही. संघाच्या अंजेड्याला पाठिंबा दिल्यासारखे हे वागत आहेत. तुम्ही न्याय, प्रेम आणि इतर गोष्टींबद्दल गोंगाट करत राहायचा, हिंदुत्व अधिक कणखर बनवायचे आणि आम्ही मात्र बाबरी विषयी बोलायचेही नाही, (हे कसे चालेल?), असा खोचक टोला त्यांना लगावला.
दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की त्यांचा पक्ष मंगळवारी दिल्लीतील सर्व ७० विधानसभा मतदारसंघात सुंदरकांड पठण कार्यक्रम आयोजित करेल. पुढील आठवड्यापासून प्रत्येक मंगळवारपासून शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघ आणि महापालिका प्रभागांसह २ हजार ६०० ठिकाणी सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार आहे. यासाठी आम आदमी पार्टीमध्ये एक संघटना तयार करण्यात आली आहे. सुंदरकांड हा रामचरितमानस या महाकाव्याचा एक अध्याय आहे. हे भगवान हनुमानाला समर्पित आहे.