छातीवर गोळ्या झेलू पण कागदपत्रं दाखवणार नाही - असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:21 AM2020-02-10T10:21:21+5:302020-02-10T10:27:16+5:30
सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
हैदराबाद : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी काहीही झाले तरी कोणतीच कागदपत्रे दाखविणार नाही. छातीवर गोळ्या झेलण्याची माझी तयारी आहे. मात्र, देश सोडणार नाही, मी भारतातच राहणार, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
हैदराबादमध्ये रविवारी सीएए आणि एनआरसी विरोधात एका जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात जे आवाज उठवतील, त्यांना खऱ्या अर्थाने मर्द-ए-मुजाहिद म्हटले जाईल...मी देशात राहणार, कागद दाखविणार नाही. जर कागद दाखविण्याची वेळ येईल, त्यावेळी छाती दाखवीन आणि सांगेन गोळ्या घाला. छातीवर गोळ्या झेलण्याची माझी तयारी आहे. कारण, भारताबद्दल माझ्या मनात प्रेम आहे."
A Owaisi: Jo Modi-Shah ke khilaaf awaaz uthayega woh sahi maayne mein mard-e-mujahid keh layega...Main watan mein rahunga,kaagaz nahi dikhaunga. Kagaz agar dikhane ki baat hogi toh seena dikhayenge ki maar goli. Maar dil pe goli maar kyunki dil mein Bharat ki mohabbat hai.#CAApic.twitter.com/5VOPBgK8Ze
— ANI (@ANI) February 10, 2020
दरम्यान, सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.
मंदिर-मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी द्या - अकबरुद्दीन ओवेसी
एमआएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा सरकारकडे हैदराबाद शहरातील मंदिर आणि एका मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. त्यावर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे.
एका सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, ओवेसी यांनी रविवारी प्रगती भवन येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात शहरातील सिंहवाहिनी महाकाली मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी रुपये आणि अफलजगंज मशिदीच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.