'भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:24 PM2018-12-02T17:24:26+5:302018-12-02T17:35:08+5:30
असदुद्दीन ओवैसी यांना योगी आदित्यनाथ यांचा इशारा
हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी काँग्रेस आणि भाजपावर वारंवार बरसत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओवैसींना थेट इशारा दिला आहे. भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं.
योगी आदित्यनाथ यांच्या या इशाऱ्याला ओवैसी प्रत्युत्तर देणार आहेत. याचे संकेत त्यांनी ट्विटरवरुन दिले आहेत. 'संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान होणाऱ्या सभेतून योगींना उत्तर दिलं जाईल,' असं ट्विट ओवैसींनी केलं आहे. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ ओवैसींवर बरसले. 'मी तुम्हाला विश्वास देतो की, तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवैसींनी निजामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल,' असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
@CMOfficeUP Mera jawab zaroor suno 7pm se 10pm ke Har jalsa mein https://t.co/hBvGBjBhld
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 2, 2018
याआधी भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी ओवैसींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. 'ओवैसींचं शीर धडावेगळं केल्यावरच मी संतुष्ट होईन,' असं राजा सिंह यांनी म्हटलं होतं. याआधी असदुद्दीन ओवैसी यांनी सैदाबादमधील एका सभेत बोलताना भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. 'मुस्लिमांची धार्मिक स्थळं, मदरसे बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असा आरोप त्यांनी केला होता. तेलंगणात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी होईल.