‘असानी’मुळे वाढणार अनेक राज्यांत तापमान; चक्रीवादळामुळे गारपीट आणि पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 07:14 AM2022-03-19T07:14:32+5:302022-03-19T07:14:40+5:30
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर हाेण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे देशातील बहुतांश भागात विशेषतः मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चक्रीवादळाचे नाव असानी ठेवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ राहणार आहे. कमी दाबाचा पट्टा २२ मार्चपर्यंत चक्रीवादळात परिवर्तित हाेणार आहे. त्यामुळे शनिवारपासून मंगळवारपर्यंत या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याशिवाय विदर्भ, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागातही तापमान वाढणार असल्याचे
हवामान खात्याने म्हटले आहे. चक्रीवादळ दक्षिण-पूर्व भागाकडे सरकणार आहे. त्यामुळे अंदमान आणि निकाेबारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.