Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 02:22 PM2020-03-25T14:22:31+5:302020-03-25T14:29:45+5:30
ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे. यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल.
जयपूर - जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद असलेले आसाराम आणि राजस्थान सरकारचे माजी मंत्री महिपाल मदेरणा यांच्यासह इतर कैद्यांनी उपोषण सुरू केले आहे. कारागृहात कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सुटकेची मागणी केली आहे.
या कैद्यांनी कारागृह प्रशासनाला पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या नावे आपल्या सुटकेची मागणी करणारे पत्र सोपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूर मध्यवर्ती कारागृहात सध्या 1375 कैदी आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येथील कैद्यांनी मंगळवारी उपोषण केले. सकाळच्या वेळी कारागृहात भोजन बनवण्यात आले होते. मात्र, या कैद्याने भोजन करण्यास नकार दिला. हे कैदी कारागृहातून सुटका करण्याची मागणी करत आहेत. यानंतर आता प्रशासनाने, ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी तयार केली असून ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे. यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल.
राजस्थानातील भीलवाडा येथे आतापर्यंत तब्बल 13 तर झुंझनूं येथे 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून भीलवाडा आणि झुंझुनूं येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
देशातील कोरोनाचा आकडा 107वर -
कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर गेली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
...तर 13 लाखांवर पोहोचू शकतो भारतातील कोरोना ग्रस्तांचा आकडा
भारतातील कोरोनाग्रस्त आणि संसर्ग पाहून शास्त्रज्ञांनी एक इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या मते भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल 13 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी कमी टेस्ट केल्या आहेत. इतर देशांपेक्षा भारतात ही संख्या कमी आहे. 18 मार्चपर्यंत भारतात केवळ 11 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे. न्यूज़ एजन्सी IANS च्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा अभ्यास करणाऱ्या COV-IND-19 स्टडी ग्रुपच्या रिसर्चची आकडेवारी पाहून ही शंका व्यक्त केली आहे.