आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:11 AM2019-07-16T04:11:52+5:302019-07-16T04:12:01+5:30
बलात्काराच्या खटल्यातील आरोपी आसाराम बापू याचा जामीन अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.
नवी दिल्ली : बलात्काराच्या खटल्यातील आरोपी आसाराम बापू याचा जामीन अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती एन. व्ही. रामना आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाला गुजरातच्या वतीने बाजू मांडणारे सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, या प्रकरणी खटला सुरू असून अजून दहा जणांची साक्ष व्हायची आहे.
गुजरात उच्च न्यायालयाने जानेवारी २०१५ मध्ये आसाराम बापू याचा जामीन अर्ज फेटाळला होता त्याच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सूरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी आसाराम बापू व त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्कार आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याची इतर आरोपांसह स्वतंत्र तक्रार केलेली आहे. किशोरवयीन मुलीवरील बलात्काराची स्वतंत्र तक्रार राजस्थानमध्ये दाखल झाली होती. आसाराम बापू याने जोधपूर न्यायालयाच्या निर्णयाला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.