आसाराम बापूकडे २,३०० कोटींची अघोषित संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2016 01:43 AM2016-06-23T01:43:52+5:302016-06-23T01:43:52+5:30
आसाराम बापूच्या धर्मादाय संस्थांकडे २,३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आढळून आल्याने प्राप्तिकर खात्याने या संस्थांना देण्यात येणाऱ्या करसवलती रद्द करण्याची शिफारस केली आहे.
नवी दिल्ली : आसाराम बापूच्या धर्मादाय संस्थांकडे २,३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आढळून आल्याने प्राप्तिकर खात्याने या संस्थांना देण्यात येणाऱ्या करसवलती रद्द करण्याची शिफारस केली आहे.
आसाराम व त्याच्या अनुयायांनी स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड, किसान विकास पत्र आणि फिक्स डिपॉझिट योजनांत गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात मालमत्ता दडविली असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. आसाराम याच्या आश्रमांनी २००८-०९ पासून २,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न दडविल्याचे खात्याचे म्हणणे आहे.
आसारामच्या कोलकात्यात सात कंपन्या असून, त्या त्याचे भक्त चालवितात. आसारामने कर्जपुरवठा व्यवसायही सुरू केला होता. १९९१-९२ पासून त्याने आतापर्यंत १,४०० हून अधिक लोकांना ३,८०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
एक ते दोन टक्के व्याजाने हे कर्ज देण्यात आले होते व त्यासाठी हमी म्हणून पोस्ट डेटेड चेक, शपथपत्र आणि जमिनीची कागदपत्रे घेतली होती. आलेल्या देणग्या दडविण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्यात आल्याचे आढळून आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)