आसाराम बापूची अघोषित कमाई २,३०० कोटी
By admin | Published: June 22, 2016 08:38 AM2016-06-22T08:38:58+5:302016-06-22T08:38:58+5:30
स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचे अघोषित उत्पन्न २,३०० कोटींच्या घरात असल्याची नवी माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२- अल्पवयीन मुलीवर लैंगिक जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचे अघोषित उत्पन्न २,३०० कोटींच्या घरात असल्याची नवी माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने आयकर अधिका-यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
आयकर खात्याला चौकशीतून आसारामचे २००८-०९ पासूनचे अघोषित उत्पन्न २,३०० कोटींच्या जवळपास असल्याचे संकेत मिळाले आहेत. आसारामचे नियंत्रण असलेल्या चॅरिटेबल ट्रस्टला दिलेली टॅक्स ब्रेकची सवलत रद्द करण्याची शिफारस आयकर खात्याने केली आहे. रिअल इस्टेट, म्युचल फंड, शेअर,किसान विकास पत्र, फिक्स डिपॉझिटमध्ये आसारामची कोटयावधीची बेनामी गुंतवणूक असल्याचे आयकर खात्याला तपासात आढळले आहे.
कोलकाता स्थित सात खासगी कंपन्यांमधून बहुतांश गुंतवणूक झाली असून, या कंपन्या आसारामच्या ताब्यात असून त्याचे पाठिराखे या कंपन्या संभाळतात असे आयकर खात्यातील सूत्रांनी सांगितले. आसाराम त्याच्या पाठिराख्यांच्या मदतीने व्यक्तीगत आणि कंपन्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात कर्ज देतो ज्यावर तो महिना एक ते दोन टक्के व्याज आकारत असल्याचे तपासात समोर आले आहे.
१९९१-९२ पासून आसाराम आणि त्याच्या पाठिराख्यांनी भारतात १४०० पेक्षा जास्त जणांना ३८०० कोटी रुपयांचे कर्ज म्हणून वाटप केल्याचे समोर आले आहे.