'लवकरच बाहेर येईन', तुरुंगातील आसारामचं फोनवरून भक्तांना लाईव्ह प्रवचन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 02:37 PM2018-04-28T14:37:23+5:302018-04-28T14:37:23+5:30
भक्तांना मोबाइलवरून प्रवचन देत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे.
पाटणा- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. आसाराम बापू तुरुंगातून मोबाइलवरून लाईव्ह प्रवचन देत असल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. भक्तांना मोबाइलवरून प्रवचन देत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. आसारामला शिक्षा सुनावल्यानंतरचा हा ऑडिओ असल्याचं बोललं जात आहे.
आसारामची ही ऑडिओ क्लिप त्यांचं फेसबुक पेज आणि मोबाइल अॅप 'मंगलमय'वर शेअर केली गेली आहे. पण यावरून वाद निर्माण होऊ नये म्हणून ती क्लिप डिलीट करण्यात आली. 'मी लवकरच तुरुंगातून बाहेर येईल. वरिष्ठ कोर्ट माझ्या शिक्षेला रद्द करेल, मला अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. मी आधी मुलगी शिल्पीला बाहेर काढीन नंतर शरदचंद्रला बाहेर काढीन त्यानंतर मी स्वतः बाहेर येईन, असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा दावा केला जातो आहे.
आसारामचं हे ऑडिओ प्रवचन समोर आल्यानंतर तुरुंगातही खळबळ उडाली. जोधपूर तुरूंगाचे अधिकारी विक्रम सिंह यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आसारामचं कैदी अधिकाराचा वापर करत साबरमती आश्रमात फोनवरून बोलणं झालं होतं. तुरुंगात असताना कैद्यांना 120 रुपये जमा करून 80 मिनिटं फोनवर बोलण्याचा अधिकार मिळतो. आसाराम फोनवर बोलताना कुठल्याही आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या नव्हता ज्यामुळे तुरुंग प्रशासना त्याच्यावर कारवाई करेल. साबरमती आश्रमात आसारामने फोन केल्यावर त्याचं बोलणं कुणीतरी रेकॉर्ड केलं असावं. व तो कॉल प्रसारीत केला असावा,असं ते म्हणाले.
पण आसारामच्या फेसबुक अकाऊंटवर ऑडिओ जारी होण्याआधीच फेसबुक पेजवरून ऑडिओ प्रवचनबद्दलची महिती देण्यात आली होती. '27 एप्रिल रोजी जोधपूर तुरुंगातून संध्याकाळी 6.30 वाजता आसारामचं ऑडिओ लाइव्ह होण्याची शक्यता आहे. नक्की ऐका. असं फेसुबक पेजवर पोस्ट करण्यात आलं. यावरून वाद सुरू झाला आहे. वाद सुरू झाल्यानंतर फेसबुक पेज व 'मंगलमय' अॅपवरून काढून टाकण्यात आलं.