आसारामची संपत्ती किती आहे, माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 04:53 PM2018-04-25T16:53:30+5:302018-04-25T16:53:30+5:30

संपत्तीचा आकडा पाहून चक्रावून जाल

asaram rape case asaram has assets worth rs 10 thousand crore | आसारामची संपत्ती किती आहे, माहितीये का?

आसारामची संपत्ती किती आहे, माहितीये का?

अहमदाबाद: अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या आसाराम जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. सकाळपासूनच आसारामचे भक्त त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. खुद्द आसारामदेखील न्यायालयात हरि ओमचा जप करत होता. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. 

स्वयंघोषित संत असलेल्या आसारामचे अनेक आश्रम आहेत. 2013 मध्ये आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे. आसारामकडे जवळपास 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती 2014 मध्ये गुजरात पोलिसांनी दिली होती. संपत्तीच्या मूल्याचा हा आकडा 2014 मधील असल्यानं आता त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे 10 हजार कोटींच्या संपत्तीत आसारामनं देशभरात घेतलेल्या जमिनींचा समावेश नाही. 

सूरत पोलिसांच्या माहितीनुसार, आसारामच्या आश्रमांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रं सापडली. यामधून आसारामच्या आश्रमाची बँक खात्यांमधील रक्कम आणि गुंतवणूक 9 हजार ते 10 हजार कोटी रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये आसारामच्या जमिनीचा समावेश नव्हता. एकट्या गुजरातमधील 10 जिल्ह्यांमध्ये आसारामच्या 45 ठिकाणी जमिनी आहेत. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील आठ जिल्ह्यांमधील 33 ठिकाणी आसारामची जमीन आहे. 

आयकर खात्याच्या सूरतमधील विभागानं आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साईची अडीच हजार कोटींची संपत्ती उजेडात आणली होती. या संपत्तीचा उल्लेख कोणत्याही सरकारी कागदपत्रांमध्ये आसारामनं केलेला नव्हता. आसारामच्या अहमदाबादमधील आश्रमातील 42 बॅगांमध्ये सापडलेल्या काही कागदपत्रांमधून आयकर खात्यानं अडीच हजार कोटींची संपत्ती शोधून काढली होती. यानंतर आयकर विभागानं आसाराम आणि त्याच्या मुलाकडून 750 कोटींचा दंड वसूल केला होता. 
 

Web Title: asaram rape case asaram has assets worth rs 10 thousand crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.