आसुमलचा झाला आसाराम, कमावले १0 हजार कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:37 AM2018-04-26T00:37:03+5:302018-04-26T00:37:03+5:30
मुलगा नारायण साई हाही बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगामध्येच
जोधपूर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जन्मलेला आसुमलने नैनितालच्या एका गुरूकडे दीक्षा घेतली आणि त्याचा आसाराम झाला. अहमदाबादेत पहिला आश्रम सुरू केला आणि बघताबघता त्याचे देशविदेशात ४०० आश्रम झाले. या आपल्या आश्रमांद्वारे आणि उत्पादनांद्वारे त्याने १० हजार कोटींची माया जमवली आहे.
त्याचा मुलगा नारायण साई याची मालमत्ता ५ हजार कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येते. पण हाच आसाराम एके काळी अहमदाबादमध्ये छोटासा धंदा करून घर चालवायचा. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जन्मलेला आसुमल याने काही काळ अजमेरमध्ये सायकल रिक्षाही चालवली. अजमेर रेल्वे स्टेशन ते चिस्ती बाबाचा दर्गा अशी रिक्षा चालवून तो कमाई करायचा. पुढे त्याने नैनितालच्या एका गुरूकडे दीक्षा घेतली व आसुमलचा आसाराम झाला. त्याने पहिला आश्रम अहमदाबादमध्ये सुरू केला. आज त्याचे देशभरात ४00 आश्रम व काही लाख अनुयायी आहेत. त्याच्या भक्तांना आसाराम गुन्हेगार नाही आणि त्याला अडकावण्यात आले आहे, असे आहे वाटत आहे. त्यामुळे त्याच्या आश्रमात आजही गर्दी होते. त्याचा मुलगा नारायण साई हाही बलात्कार प्रकरणात तुरुंगामध्येच आहे.
बलात्कारानंतर १५ दिवसांत अटक
ज्या प्रकरणात आसारामला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली, त्याने उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील पण आसारामच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. आसारामने आश्रमात बोलावून १५ आॅगस्ट २0१३ रोजीच्या रात्री तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या तक्रारीनंतर त्याला १ सप्टेंबर २0१३ रोजी अटक करण्यात आली होती. मुलीच्या तक्रारीनंतर जोधपूर पोलिसांनी ११ दिवसांत तपास करून आसारामला अटक केली.