विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार अशोक चव्हाण : सरकार आरएसएस चालवतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2016 11:49 PM2016-03-05T23:49:30+5:302016-03-05T23:56:10+5:30
सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे.
जळगाव- सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे. अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापासून आम्हाला असा त्रास दिला जात आहे. आम्ही कार्यक्रमांमध्ये जे बोलतो ते राज्य शासनासह दिल्लीपर्यंत अगदी शब्दन् शब्द स्वरुपात पाठविले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरकार चालवित आहे. लोकांमध्ये फूट पाडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी जळगावात काँग्रेसच्या कार्यकर्ता कार्यशाळेत केला.
लेवा भवनात ही कार्यशाळा झाली. व्यासपीठावर आमदार भाई जगताप, भा.ई.नगराळे, जिल्हा प्रभारी शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ग्रा.पं.स्तरावपर्यंत आरएसएस विष पसरवित आहे. अगदी मलाही आरएसएसचे कार्यकर्ते दिल्लीत भेटले. त्यांनी मला आरएसएसची धोरणे, उद्देश याची माहिती दिली, पण मी काँग्रेसच्या विचारांचा आहे.
मंत्रीमंडळाचा दौरा फोटोंसाठी
अधिवेशनापूर्वी आता मंत्रीमंडळाने दुष्काळ दौरा सुरू केला, पण ते फक्त फोटो काढून घेण्यासाठी व आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्यासाठी काही जिल्ामध्ये फिरले. सायंकाळी पार्टी खाऊन ते निघून गेले, अशी टिकाही चव्हाण यांनी केली.
विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी
रोहित वेमुला, कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले, देशात सध्या जे घडतेय ते घातक आहे. जे विचार मांडतात, सरकारच्या विरोधात बोलतात त्यांची मुस्कटदाबी केली जाते. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून देशद्रोही ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला.
स्वबळावर लढू
आगामी काळात जि.प., पं.स.च्या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील. त्या त्या जिल्ांची स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रासंगिक करार केले जातील. पण राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पाळत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक लढणार नाही. तसेच काँग्रेसमध्ये पुनर्बांधणीच्या दृष्टीने राज्यभरत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संबंधित जिल्ाबाहेरील प्रभारी नियुक्त केला जाईल, असे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे देताना स्पष्ट केले.