Burning Car: स्वप्नांची राखरांगोळी! सेकंड हँड कार खरेदी केली, घरी जाण्यापूर्वीच जळून खाक झाली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 03:41 PM2023-05-25T15:41:59+5:302023-05-25T15:42:34+5:30
Burning Car: आपल्याकडे चार चाकी असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण व्हावं यासाठी अनेक जण अपार कष्ट घेतात. अशाच एका व्यक्तीने मोठ्या कष्टाने सेकंड हँड कार खरेदी केली होती. मात्र तो दुर्दैवी ठरला.
आपल्याकडे चार चाकी असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण व्हावं यासाठी अनेक जण अपार कष्ट घेतात. अशाच एका व्यक्तीने मोठ्या कष्टाने सेकंड हँड कार खरेदी केली होती. मात्र तो दुर्दैवी ठरला. खरेदी केलेली कार घरी नेण्यापूर्वी वाटेत आग लागून जळून गेली. ही घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. येथील हमीरपूर जिल्ह्यातील मुंडखर येथील रहिवासी असलेल्या संजीव कुमार यांनी कुल्लू येथून एक सेकंड हँड कार खरेदी केली होती. ती घेऊन ते घरी येत होते. मात्र यादरम्यान, मंडीमध्ये चंडीगड-मनाली महामार्गावर खोतीनाला येथे या कारला अचानक आग लागली.
संजीव कुमार हे स्वत: प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर आले. मात्र त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांची संपूर्ण कार पेटली. तिथे कुठलीही आपातकालीन यंत्रणा नसल्याने संपूर्ण कार बघता बघता जळून खाक झाली. बऱ्याच वेळाने कारवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत संजीव यांचं स्वप्न जळून खाक झालं होतं.
संजीव कुमार यांनी सांगितलं की, ते पेशाने ड्रायव्हर आहेत. तसेच सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी कुल्लू येथे गेले होते. तिथून परतत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, हल्लीच गेल्या आठवड्यामध्ये १५ मे रोजी अशीच एक दुर्घटना मंडी जिल्ह्यातील बीबीएमबी कॉलनीमध्ये घडली होती. तेव्हाही रस्त्यावरून जाणाऱ्या कारला अचानक आग लागली होती. तेव्हाही कारमधून प्रवास करत असलेल्या दाम्पत्याने बाहेर उडी मारून आपले प्राण वाचवले होते.