Corona Virus : मोठा दिलासा! अश्वगंधा करणार कोरोना व्हायरस जीनचा खात्मा; BHU शास्त्रज्ञांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 03:24 PM2023-06-01T15:24:55+5:302023-06-01T15:38:13+5:30
Corona Virus : जगात प्रथमच अश्वगंधाच्या मॉलिक्यूलचा कोरोना व्हायरसवर होणाऱ्या परिणामाचा यशस्वीपणे अभ्यास करण्यात आला आहे
कोरोनाच्या संकटात सकारात्मक माहिती समोर आली आहे. अश्वगंधाच्या मॉलिक्यूलमुळे कोरोना व्हायरसचे जीन नष्ट करण्यात BHU शास्त्रज्ञांना मोठं यश आलं आहे. जगात प्रथमच अश्वगंधाच्या मॉलिक्यूलचा कोरोना व्हायरसवर होणाऱ्या परिणामाचा यशस्वीपणे अभ्यास करण्यात आला आहे. त्याला जर्मन पेटेंटही मिळालं आहे. वर्षाअखेरीस भारताला कोरोनाविरुद्ध मोठं शस्त्र मिळण्याची शक्यता आहे. बीएचयूच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या टीमला तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर यश मिळालं आहे.
तीन हजारांहून अधिक मॉलिक्यूल आणि 41 वनस्पतींच्या चाचणीनंतर अश्वगंधाच्या मॉलिक्यूलने 87 टक्क्यांहून अधिक कोरोना व्हायरस नष्ट करण्यात मदत केली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर जेनेटिक डिसऑर्डरचे प्रो. परिमल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, SARS-CoV-2 व्हायरसमुळे सार्वजनिक आरोग्याला जागतिक धोका निर्माण झाला आहे.
अश्वगंधापासून निघणारे सॉम्निफेरिसिन फायटोमॉलिक्युल ग्रोथ इनहिबिटर हे या व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रभावी शस्त्र बनू शकतं. अश्वगंधाचा हा मॉलिक्यूल एकाच वेळी कोरोनाच्या तीन जीनचे खात्मा करण्यास उपयुक्त ठरेल. मानवी पेशींवरही त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. सरकारच्या मदतीने त्याची क्लिनिकल चाचणी लवकरच केली जाईल. संशोधन टीममध्ये अनेक तज्ञांचा समावेश होता. प्रशांत रंजन, नेहा, चंद्रा देवी, डॉ.गरिमा जैन, प्रशस्ती यादव, डॉ. चंदना बसू मलिक आणि डॉ. भाग्य लक्ष्मी महापात्रा यांनी महत्त्वाचं काम केलं आहे.
संशोधन सहयोगी प्रशांत रंजन यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसवर आतापर्यंत अश्वगंधाला अनुसरून कोणतंही काम झालेलं नाही. मानवी शरीरातील कोरोना व्हायरसचे जीन पूर्णपणे नष्ट करण्यात हा मॉलिक्यूल उपयुक्त ठरेल. मल्टी टार्गेट पध्दती असल्याने, ते जीन पूर्णपणे कार्य करू देणार नाही आणि ते संपवून टाकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.