‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 09:05 PM2023-07-26T21:05:52+5:302023-07-26T21:06:37+5:30

Vande Bharat Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली.

ashwini vaishnaw told about vande bharat express train stone pelting incident loss to indian railway in parliament monsoon session 2023 | ‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले...

‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले...

googlenewsNext

Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस आताच्या घडीला सर्वांत लोकप्रिय ट्रेन सेवांपैकी आहे. प्रवाशांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही समाजकंटकांमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सातत्याने नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून देशभरात विविध ठिकाणी या ट्रेनवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये किती नुकसान झाले, किती जणांना अटक करण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. भारतीय रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस देशातील विविध ठिकाणी सुरू करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. सन २०१९ मध्ये देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली. वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, सन २०१९ पासून आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीमुळे रेल्वेचे ५५ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.

किती जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे?

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, दगडफेकीच्या घटनांप्रकरणी आतापर्यंत १५१ जणांना अटक करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी किंवा कोणत्याही प्रवाशाच्या सामानाची चोरी किंवा नुकसान झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याच्या घटना २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि जून २०२३ पर्यंत घडल्या आहेत. या दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वेला ५५.६० लाख रुपयांचा नुकसान सहन करावे लागले आहे, असे ते म्हणाले

दरम्यान, रेल्वे प्रवाशांचे संरक्षण आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी RPF, GRP/जिल्हा पोलिस आणि नागरी प्रशासन यांच्याशी जवळून समन्वय साधून काम करत आहे. दगडफेकीच्या घटनांविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘ऑपरेशन साथी’ राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या घटनांचे विश्लेषण केल्यानंतर त्यांना आळा घालण्यासाठी ठोस कारवाई केली जाते. बाधित विभाग किंवा ‘ब्लॅक स्पॉट्स’मध्ये गैरप्रकार करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात नियमित मोहीम राबवली जात असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
 

Web Title: ashwini vaishnaw told about vande bharat express train stone pelting incident loss to indian railway in parliament monsoon session 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.