Ashwini Vaishnaw : रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 09:41 PM2021-12-04T21:41:20+5:302021-12-04T21:43:09+5:30
Ashwini Vaishnaw : प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेने रामायण यात्रा एक्सप्रेस चालवली आहे
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेनेरामायण यात्रा एक्सप्रेस सुरू केली आहे. याच पार्श्वभमीवर रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांना एक सवाल करण्यात आला. याचे उत्तरही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टपणे दिले आहे. रामायण एक्सप्रेसप्रमाणेच बायबल, कुराण एक्सप्रेस, गुरुग्रंथ एक्सप्रेसही देशात धावू शकतात का? असा सवाल अश्विनी वैष्णव यांना करण्यात आला होता. यावर रामायण एक्सप्रेस ही फक्त सुरुवात आहे, भविष्यात काहीही होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
आजतकच्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सहभागी झाले होते. यावेळी जगातील इतर देश छोट्या-छोट्या गोष्टी अशा प्रकारे दाखवतात, जणू काही मोठी गोष्ट आहे, त्याला मोठा इतिहास आहे. आपल्या इथे खूप वारसा आहे. आमचे किल्ले, सफारी, आयुर्वेद, मग ते लोकांना दाखवू नये का? असे ते म्हणाले. तसेच, बायबल, कुराण, गुरुग्रंथ एक्सप्रेस रामायण एक्सप्रेसप्रमाणे धावतील का? या प्रश्नावर ते म्हणाले की, रामायण एक्सप्रेस ही फक्त सुरुवात आहे, भविष्यात काहीही होऊ शकते. भारताचे अनेक पैलू आहेत, प्रत्येक पैलूवर ट्रेन बनू शकते. या सर्व गोष्टींमध्ये लोक खूप रस घेत आहेत.
याचबरोबर, ते म्हणाले की, प्रत्येक शहराची वेगळी संस्कृती असते. स्टेशन शहराच्या संस्कृतीशी जुळले पाहिजे. प्रवाशांचा अनुभव चांगला असायला हवा, हे ध्यानात घेऊन तयार करण्यात येत आहे. आम्ही 40 मॉडेल स्टेशन तयार करत आहोत. यात राजकारण नाही. पुढील दोन ते तीन वर्षांत अशी 250-300 स्थानके बांधली जातील. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितले आहे की, अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचा विस्तार व्हावा की पुढील 50 वर्षे टिकले पाहिजे. पुढील दोन तीन वर्षांत अडीचशे ते तीनशे रेल्वे स्थानकांचा कायापालट होईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
खासगीकरण होणार की नाही...
सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेला खासगी हातांमध्ये सोपविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रेल्वेचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. जगभरातील रेल्वे सरकार चालवितात, इथेही सरकारच रेल्वे चालवेल असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.
रामायण एक्सप्रेस 7 नोव्हेंबरपासून सुरू
प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेने रामायण यात्रा एक्सप्रेस चालवली आहे. IRCTC ने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 'देखो अपना देश' या उपक्रमांतर्गत ही डीलक्स एसी टुरिस्ट एक्सप्रेस सुरू केली आहे. रामायण एक्सप्रेस ही 7 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ही एक्सप्रेस प्रभू श्रीरामाशी संबंधित सर्व ठिकाणी फिरेल. 'देखो अपना देश' अंतर्गत या विशेष एक्सप्रेसचा प्रवास अयोध्या, सीतामढी, काशी, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट, नाशिक आणि नंतर प्राचीन किष्किंदा शहर हंपी येथील मंदिराना भेट देईल.