'कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:06 PM2018-10-16T12:06:27+5:302018-10-16T14:05:22+5:30
भारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे.
लुधियाना - जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता की त्यांना तो भेट म्हणून देण्यात आला होता. हा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी नेहमीच विचारला जातो. मात्र आता या प्रश्नाचं कोडं लवकरच उलघडणार आहे. भारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्त्व विभागाने केला आहे. नऊ वर्षांच्या महाराजा दुलिप सिंह यांच्यासोबत करण्यात आलेल्या तहानुसार त्यांनी कोहिनूर हिरा हिसकावून नेला असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरातत्त्व विभागाने दिली आहे.
महाराज रणजित सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता, हा सरकारचा दावा पुरातत्व विभागाच्या खुलाशामुळे आता खोटा ठरला आहे. एप्रिल 2016 मध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली होती. लाहोरच्या महाराजांनी कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात दिला होता, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच अँग्लो-शीख युद्धाच्या खर्चाची भरपाई म्हणून रणजित सिंह यांच्या नातलगांनी स्वेच्छेन कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता, असे सरकारने एका जनहित याचिकेला उत्तर देताना सांगितले होते.
सामाजिक कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी आरटीआय दाखल करून कोणत्या आधारावर कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता?, असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्तर दिले आहे. कोहिनूर हिऱ्याची माहिती मागवण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा यासंदर्भात मला काहीही माहिती नव्हते. म्हणून मी तो अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो अर्ज एएसआयकडे पाठवला, असे रोहित सबरवाल यांनी सांगितले. रोहित यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नोंदीनुसार लाहोरमध्ये लॉर्ड डलहौसी आणि महाराजा दुलिप सिंह यांच्यात 1849 साली कथित करार झाला असल्याचं सांगितलं. लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीकडे कोहिनूर हिरा सोपवला होता. परंतु दुलिप सिंह यांच्या इच्छेनुसार तो इंग्रजांकडे सोपवला नव्हता, हेच स्पष्ट होत आहे. कारण करार झाला त्यावेळी दुलिप सिंह केवळ 9 वर्षांचे होते, असे एएसआयने रोहित सबरवाल यांना पाठवलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.