आशियाई विकास बँकेनेही केली भारताच्या विकास दरामध्ये घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 04:06 AM2019-12-12T04:06:52+5:302019-12-12T04:07:35+5:30
आता ५.१ टक्केच; औद्योगिक मंदी, रोखीचे संकट कारणीभूत
नवी दिल्ली : भारताचा या आर्थिक वर्षाचा विकासाचा दर ५.१ टक्के इतकाच असेल, असा अंदाज आशियाई विकास बँकेने व्यक्त केला असून, आर्थिक मंदी व बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ संथ असेल, असेल असे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. पुढील वर्षीही विकासाच्या दरात वाढ शक्य आहे, असे, आशियाई विकास बँकेने म्हटले आहे.
मूडीज, फिंच, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सर्वांनीही भारताचा विकासाचा दर कमी असेल, असे या आधी म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने विकास दर ५ टक्के राहील, असे गेल्याच आठवड्यात पतधोरण बैठकीनंतर म्हटले होते. त्या आधी हा दर ६.१ टक्के असेल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. आशियाई बँकेने, तसेच मत व्यक्त करताना भारताबरोबरच चीनच्या विकास दरातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे रोजगारनिर्मितीला खिळ बसली आहे, तसेच रोखीचे संकटही गडद होत चालले आहे. त्यामुळे विकास दरात वाढ होण्यात अडचणी येत आहे, असे या बँकेने नमूद केले आहे. भारत व चीन या दोन मोठ्या देशांतील मंदीचा परिणाम आशियाई देशांवर होत असल्याचेही या बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. संपूर्ण आशिया खंडात सध्या मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे आशियाई खंडाचा विकास दर ५.२ राहील, असे बँकेचे मत आहे. या आधी हा दर ५.४ टक्के असेल, असे बँकेने म्हटले होते.
व्यापारी युद्धाचा चीनला फटका
आशियाई विकास बँकेने चीनचा विकासदर या वर्षी ६.१ टक्के, तर पुढील वर्षी त्यात आणखी घट होऊ न ५.८ असेल, असे मत व्यक्त केले आहे. अमेरिका व चीनमध्ये सध्या जे व्यापारयुद्ध सुरू आहे, त्याचा चीनचा व्यापार आणि उद्योग यांच्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकेने पुढील वर्षी त्या देशाच्या विकास दरात आणखी घट होईल, असे म्हटले आहे.