आशियातील सर्वात मोठ्या इंडियन एअरफोर्सच्या एअरबेसवर घुसखोरीचा प्रयत्न फसला, अलर्ट जवानांनी लगेच घेतली अॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 09:17 AM2017-11-15T09:17:07+5:302017-11-15T09:43:36+5:30
वेर्स्टन कमांडचा भाग असलेले हिंदन एअरबेस इंडियन एअरफोर्सचा महत्वाचा तळ आहे. भिंत चढून घुसखोरीचा प्रयत्न करणा-या या इसमावर अखेर गोळी झाडावी लागली.
गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील उच्च सुरक्षा असलेल्या हिंदन एअरबेसवर मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास एका इसमाने घुसखोरीचा प्रयत्न केला. वेर्स्टन कमांडचा भाग असलेले हिंदन एअरबेस इंडियन एअरफोर्सचा महत्वाचा तळ आहे. भिंत चढून घुसखोरीचा प्रयत्न करणा-या या इसमावर अखेर गोळी झाडावी लागली. त्यात हा इसम जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजीत असे आरोपीचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे राहतो.
हिंदन एअरबेसच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी आधी सुजीतला रोखले. तरीही त्याने इशा-याकडे दुर्लक्ष करुन भिंत चढण्यास सुरुवात केली. तेव्हा तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी डाव्या पायावर गोळी झाडली. साहीबाबाद पोलीस स्टेशनचे एसएचओ राकेश कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.
एअरबेसवर दहशतवादी संघटना हल्ल्याचा प्रयत्न करु शकतात असा आयबीने अलर्ट दिला होता असे एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सुजीत असे का केले ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो दहशतवादी संघटनांशी संबंधित होता का ? याची चौकशी करण्यात येईल. या घटनेनंतर हिंदन एअरबेसच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. हिंदन हा आशियातील सर्वात मोठा तर जगातील आठव्या क्रमांकाचा एअरबेस आहे. हवाई दलाची सी-17 ग्लोबमास्टर ही ट्रान्सपोर्ट विमाने येथे तैनात असतात.