आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे उद्या लोकार्पण
By admin | Published: April 1, 2017 09:52 PM2017-04-01T21:52:02+5:302017-04-01T21:52:02+5:30
उधमपूर ते रामबन या १0.८९ कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे २ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शानदार लोकार्पण होत आहे.
ऑनलाइन लोकमत
चेनानी, दि. 1 - जम्मू काश्मिरमधे जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महागार्ग ४४ वरील उधमपूर ते रामबन या १0.८९ कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे २ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शानदार लोकार्पण होत आहे. भारताची रस्ता वाहतूक विश्वस्तरीय बनवण्याच्या उद्देशाने व पायाभूत सुविधांच्या विस्तारीकरणाच्या निर्धाराने कार्यरत असलेल्या, नितीन गडकरींच्या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या इतिहासात चेनानी -नाशरी या महत्वपूर्ण बोगद्याच्या लोकार्पण सोहळयाने एक सुवर्णपान जोडले जाणार आहे.
देशातील सर्वात लांब अंतराच्या या बोगद्याचे प्रत्यक्ष काम युपीए सरकारच्या कालखंडात २३ मे २0११ रोजी सुरू झाले. २0१४ साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नितीन गडकरींनी २५१९ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाचा फास्ट ट्रॅक योजनेत समावेश केला. हिमालयाच्या शृंखलेतील खालच्या पर्वतरांगांमधे १२00 मीटर्सच्या उंचीवरील ही योजना त्यामुळेच अवघ्या ३ वर्षात साकार झाली. जम्मू श्रीनगर या २८६ कि.मी. अंतराच्या ४ लेन महामार्गावर या बोगद्याचे प्रत्यक्ष अंतर ९.२ किलोमीटर्सचे आहे. बोगद्याच्या दोन्ही तोंडापाशी दोन पूल तयार करण्यात आल्याने बोगद्याचा प्रकल्प १0.८९ कि.मी.अंतराचा झाला आहे. जम्मू श्रीनगर दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळे सुमारे ४0 कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा वेळ तब्बल अडीच तासांनी वाचणार आहे. लोकार्पण सोहळयाच्या एक दिवस आधी शनिवारी दिल्लीतील पत्रकारांच्या पथकाला या बोगद्याचा प्रत्यक्ष प्रवास घडवून ही माहिती आयएलएफएसच्या अधिकाऱ्यांनी पुरवली.
जम्मू काश्मिरमधे पर्वताच्या आतून तयार करण्यात आलेल्या आशिया खंडातील या सर्वात मोठया व लक्षवेधी बोगद्याची वैशिष्ठये अनेक आहेत. अर्धवर्तुळाकार मुख्य बोगद्याची लांबी ९.२0 कि.मी. व रूंदी ९.३५ मीटर्स आहे. याखेरीज दोन्ही बाजूला १.३0 मीटर्सचे पादचारी मार्ग आहेत. याच बोगद्याला जोडून समांतर रेषेत दुसरा एक बोगदाही तयार करण्यात आला आहे. बंद पडलेल्या वाहनांमुळे बोगद्यात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. दोन्ही बोगद्यांना जोडणारे २९ क्रॉसिंग टनेल्स आहेत. प्रत्येक क्रॉसिंग ३५ मीटर्स लांबीचे आहे.
बोगद्यातील वाहतूक सुरळीतपणे चालावी यासाठी एकिकृत ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम, आकर्षक विद्युत रोषणाई, प्रवेश नियंत्रण प्रणाली, विद्युत आग संकेत प्रणाली, उत्तम दर्जाची अग्निशमन व्यवस्था, २४ तास व्हिडीओव्दारे वाहतुकीची देखरेख, एफ एम रिब्रॉडकास्ट व्यवस्था, वायरलेस कम्युनिकेशन, उत्तम दर्जाचे वायुविजन, संकटाची माहिती देण्यासाठी प्रत्येक १५0 मीटर्सवर एसओएस कॉल व्यवस्था, अशा अनेक आधुनिक यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगांमधील अत्यंत कठीण भागात स्थापत्य कलेचा हा उत्तम अविष्कार आहे. बोगदा पर्वताच्या आतून असल्याने वृक्षतोड अथवा पर्यावरणाची कोणतीही हानी या प्रकल्पात झालेली नाही.
जगात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आॅरलँड व लायरडेल मार्गावर नॉर्वेत आहे. त्याची लांबी २४.५१ कि.मी.आहे. त्याखालोखाल आशिया खंडातल्या सर्वात मोठया बोगद्याची निर्मिती भारतात झाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे आज लोकार्पण होत आहे.