काश्मीरात भडकली होती हिंसा, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 01:12 PM2023-06-23T13:12:23+5:302023-06-23T13:20:35+5:30
सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीर प्रशासनाने गुरुवारी २ सरकारी डॉक्टरांना निलंबित केले. या २ डॉक्टरांनी जे कृत्य केले ते ऐकून कुणाचाही संताप अनावर आहे. दोन्ही डॉक्टरांनी २००९ मध्ये शोपियात बुडून मृत पावलेल्या २ युवा काश्मिरी मुली आसिया जान आणि नीलोफर जान यांचा बनावट पोस्टमोर्टम रिपोर्ट बनवला होता. या मुलींचा बुडून नव्हे तर बलात्कारानंतर मृत्यू झाल्याचे त्यांनी रिपोर्टमध्ये म्हटलं. या प्रकरणानंतर जम्मू काश्मीरसह देशात हाहाकार माजला.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता या २ डॉक्टरांनी केलेले कृत्य सगळ्यांसमोर आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयसोबत मिळून दोघांनी हे षडयंत्र रचले होते. दोन्ही डॉक्टरांनी मुलींच्या मृत्यू रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर हत्या दाखवून धार्मिक दंगली आणि काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवण्याचा डाव होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे. सीबीआयच्या तपासात आढळले की, डॉक्टरांनी पोस्टमोर्टम रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला होता. एम्स आणि सेंट्रल फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षावरून या मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे आढळले. त्याचसोबत पाण्यात बुडण्यापूर्वी मुलींवर कुठलाही अत्याचार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुली पाण्यात बुडाल्याने नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर कुठेही बलात्कार आणि बळजबरी केल्याचे पुरावे सापडले नाही.
पाकिस्तानी एजेन्सीसाठी करत होते काम
डॉ. निघत शाहीन चिलू एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्या चाडुरा, बडगाम इथं उपजिल्हा रुग्णालयात तैनात असतात. डॉ. बिलाल अहमद दलाल, वैद्यकीय अधिकारी आहेत. हे दोघेही शोपिया सरकारी रुग्णालयात काम करत होते. हे दोघेही पाकिस्तानी एजेन्सीसाठी काम करत असल्याचे सीबीआय तपासात उघड झाले.
काश्मीरमध्ये भडकली होती हिंसा
या दोन्ही डॉक्टरांनी चुकीचा रिपोर्ट बनवत दोन्ही महिलांसोबत बलात्कार आणि हत्या झाल्याचं सांगितले. हे भारताविरोधात एक षडयंत्र होते. दोन्ही डॉक्टरांची त्यात महत्त्वाची भूमिका होती. १७ वर्षीय आसिया जान आणि २२ वर्षीय नीलोफर जान यांच्या बलात्कार आणि हत्येच्या खोट्या बातमीनं काश्मीरमध्ये हिंसा भडकली होती. त्यानंतर अनेक भागात जमावाचा आणि सुरक्षा जवानांमध्ये झटापट झाली होती. या घटनेनंतर अनेक युवक दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते.
६ हजार कोटींचे झाले नुकसान
काश्मीर हिंसाचारात ४२ ठिकाणी बंदचे आवाहन केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. ३५ पोलीस, निमलष्करी दलातील जवानांसह १३५ लोक जखमी झाले होते. या काळात ६ हजार कोटींचे नुकसान झाले होते.