गुजरातमध्ये अस्मिता पदयात्रा

By Admin | Published: August 6, 2016 03:51 AM2016-08-06T03:51:55+5:302016-08-06T03:51:55+5:30

यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही

Asmita Yatra Yatra in Gujarat | गुजरातमध्ये अस्मिता पदयात्रा

गुजरातमध्ये अस्मिता पदयात्रा

googlenewsNext


अहमदाबाद : यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही, अशा घोषणा देत, उनामध्ये चार दलितांना गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ गुजरातमधील दलितांनी शुक्रवारपासून अहमदाबादच्या वेजलपूर भागातून पदयात्रा सुरू केली.
ही दलित अस्मिता यात्रा १५ आॅगस्ट रोजी उना गावात पोहोचणार आहे. पदयात्रेतील सर्व जण आणि उना गावातील दलित त्या ठिकाणी ध्वजवंदन करून, स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.
ही पदयात्रा आज सुरू झाली, तेव्हा त्यात हजारो लाक सहभागी झाले. त्यातील ८00 लोक १0 दिवसांच्या काळात ३५0 किलोमीटर अंतर चालणार असून, मधल्या गावांतील लोकही त्यात सहभागी होणार आहेत. हजारो वर्षांपासूनच्या रूढी आणि परंपरा तोडण्यासाठी जनजागृती करणे हा या अस्मिता यात्रेचा उद्देश आहे. प्रत्येक गावांमध्ये आम्ही सभा घेणार आहोत. यापुढे मृत जनावरांची कातडी काढण्याचे आणि मैला उचलण्याचे, तसेच शौचालयांच्या सफाईचे काम दलितांनी बंद करावे, असे आमचे प्रयत्न असून, त्यासाठी प्रत्येक गावातील दलितांना सांगण्यात येईल, असे या पदयात्रेचे संघटक जीग्नेश मेवाणी यांनी सांगितले.
यापुढे आम्ही म्हणजे दलित कोणताही अन्याय आणि अत्याचार सहन करणार नाही, असा इशारा देणे हा आमचा हेतू असून, या निमित्ताने राज्यातील दलितांना आम्ही एकत्र आणणार आहोत. आम्ही आमची परंपरागत कामे यापुढे करणार नसल्याने आम्हाला शेतीसाठी जमीन देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे मेवाणी म्हणाले.
माजी आयपीएस अधिकारी राहुल शर्मा यांनी दलित अस्मिता पदयात्रेची कल्पना सुचवली आणि सर्व दलित तसेच पुरोगामी संघटनांनी ती मान्य केली. या यात्रेत राहुल शर्माही सहभागी झाले आहेत. अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग आहे. (वृत्तसंस्था)
>गीर सोमनाथ जिल्ह्यातील उना गावात ११ जुलै रोजी चार दलितांना बेदम मारहाण करण्यात आली होती. मृत गायीचे कातडे काढण्याचे ते काम करीत होते. पण तुम्हीच गायीला मारले, असा आरोप करीत गोरक्षकांनी त्यांची रस्त्यावरून धिंड काढत मारहाण केली होती. त्यामुळे गुजरातमधील दलितांमध्ये प्रचंड संताप आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात चार दलित तरुणांनी विषप्राशन केले होते. त्यातील एक जण मरण पावल्यामुळे संतापात भरच पडली.
>या दोन घटनांनंतर गुजरात सरकारही अडचणीत आले. त्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असताना दलितांना झालेली मारहाण, त्यांचे सुरू झालेले आंदोलन यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थता आहे.

Web Title: Asmita Yatra Yatra in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.