एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 08:56 AM2020-05-04T08:56:25+5:302020-05-04T09:04:01+5:30
या फोननंतर जवान आणि पोलिसांनी हंदवाडातल्या चंजमुल्ला भागातील घराला घेराव घातला आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला.
श्रीनगरः काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 13 तास चाललेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले. या चकमकीदरम्यान कर्नल आशुतोष शर्मा यांना दोनदा फोन केला असता, समोरून अस्सलाम वालेकुम असं उत्तर मिळालं. त्यानंतर सुरक्षा दलाला आपलं मोठं नुकसान झाल्याचं लक्षात आलं. या फोनवरील उत्तरानंतर जवान आणि पोलिसांनी हंदवाडातल्या चंजमुल्ला भागातील घराला घेराव घातला आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला.
44 वर्षीय कर्नल आशुतोष शर्मा 21 राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे कमांडिंग होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचनंतर कमांडर मेजर अनुज सूद (30), नायक राजेश कुमार (29), लान्स नायक दिनेश सिंह ( 24) आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपनिरीक्षक सागीर पठाण उर्फ काझी (41) हे त्याच्यासमवेत होते. त्यांनी घरात प्रवेश करून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले खरे; परंतु ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, "संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आम्ही त्यांच्याशी आणि टीमच्या इतर सदस्यांशी संपर्क साधण्याचा सर्व मार्गांचा विचार केला, पण संपर्क साधू शकलो नाही." रात्री 10च्या सुमारास 4 तासांनंतर उत्तर मिळालं. कर्नलच्या फोनवर आलेल्या कॉलला उत्तर देताना दहशतवाद्यांनी 'अस्सलाम वालेकुम,' असं सांगितलं. यानंतर चार तास थांबलेला गोळीबार पुन्हा सुरू झाला.
रात्रभर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. चकमकीच्या सुरुवातीच्या काळात घरात बंदिस्त असलेल्या कुटुंबीयांचे हात बांधलेले होते. घरात कुटुंब दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली. त्यानंतर या कुटुंबाचे नुकसान होणार नाही, याची भीती सुरक्षा दलाला सतावत होती. त्यामुळे कर्नल शर्मा आणि त्यांची टीम कुटुंबाला वाचवण्यासाठी आत शिरली. त्याचदरम्यान कर्नलच्या फोनवर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी फोन केला असता, समोरून अस्सलाम वालेकुम असं दोनदा म्हणण्यात आलं. तेव्हा जवानांनी जोरदार गोळीबार करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. पहाटे गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा कर्मचारी घरात शिरले, तेव्हा दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यातील एकाचे नाव हैदर असून, तो पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर असल्याचं समोर आलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'
होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना
... तर लॉकडाऊनचे नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतर, खासदार जलील यांचा इशारा