आसामात २०० जणांसह बोट बुडाली, ३० बेपत्ता
By admin | Published: September 28, 2015 11:41 PM2015-09-28T23:41:49+5:302015-09-28T23:41:49+5:30
आसामच्या कामरूप जिल्ह्णाच्या कोलोही नदीत सोमवारी सुमारे २०० प्रवाशांनी खचाखच भरलेली एक यांत्रिक बोट बुडाल्यानंतर ३० जण बेपत्ता आहेत.
चाईगाव (आसाम) : आसामच्या कामरूप जिल्ह्णाच्या कोलोही नदीत सोमवारी सुमारे २०० प्रवाशांनी खचाखच भरलेली एक यांत्रिक बोट बुडाल्यानंतर ३० जण बेपत्ता आहेत.
कामरूप (ग्रामीण)चे उपायुक्त विनोदकुमार शेषन यांनी ही माहिती दिली. होड्यांच्या शर्यतीत सामील होणाऱ्या लोकांना घेऊन ही बोट चाईगाववरून चम्पुपाडाकडे निघाली होती. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या मधोमध पोहोचताच तिच्या इंजिनने अचानक काम करणे बंद केले आणि ती पुलाच्या खांबाला धडकली. खांबाला धडकताच बोट उलटली आणि प्रवासी नदीत पडले.
स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ बचाव व मदत कार्य सुरू केले. एनडीआरएफ व एसडीआरएफचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. अनेक लोकांनी पोहत आपला जीव वाचवला. मात्र बोटीतील ३० जण अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरू आहे. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे दुर्घटना घडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र आसामसह देशाच्या इतर भागातील जलमार्गात आजही नावांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून बिनबोभाट वाहतूक सुरू आहे. प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होते व तात्पुरती उपाययोजना घोषित होतात. मात्र काही दिवसांनी जुनाच कित्ता सुरू होतो. (वृत्तसंस्था)