आसाममध्ये २.५ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात; ९.२ लाख शेतकऱ्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:25 PM2020-07-18T22:25:49+5:302020-07-19T06:18:11+5:30
शेतकऱ्यांवर यंदा दुहेरी संकट
आसामातील मोरीगाव जिल्ह्यातील भुरागाव येथील ३६ वर्षीय शेतकरी अन्वर हुसैन यांची दोन एकर भात शेती ब्रह्मपुत्रेला आलेल्या पुरात जलमय झाली आहे. आपले १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले, असे हुसैन यांनी सांगितले. ब्रह्मपुत्रेच्या आजूबाजूला शेती असलेल्या असंख्य शेतकºयांची स्थितीही हुसैन यांच्यापेक्षा वेगळी नाही. सर्वांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. कृषी महासंचालनालयाच्या अंदाजानुसार, यंदा ब्रह्मपुत्रेच्या पुरात २.५ लाख हेक्टरवरील पिके बुडाली आहेत. ९.२ लाख शेतकºयांना याचा फटका बसला आहे. १५ मे आणि १४ जुलै या काळातील ही स्थिती आहे.
मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू होण्याच्या सात महिने आधी हुसैन यांनी आपल्या शेतात मका लावला होता. शेतात पिकलेला मका ते दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये विकतात. या काळात त्यांना चांगला भाव मिळतो; पण यंदा नेमके या काळात लॉकडाऊन लागले. त्यामुळे त्यांच्या मक्याला फटका बसला. ते अक्षरश: कफल्लक झाले. त्यामुळे त्यांना आपली एक गाय ४३ हजार रुपयांना विकावी लागली.
बारपेटा जिल्ह्यातील सत्राकनाडा गावातील २५ वर्षीय शेतकरी नूर जमाल यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे मी माझा भाजीपाला आणि ताग विकू शकलेलो नाही. आता माझ्या शेतातील भातात पुराचे पाणी शिरले आहे. त्यातून माझे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आसामातील बहुतांश शेतकºयांची हीच कैफियत आहे. यंदा त्यांना लॉकडाऊन आणि नेहमीपेक्षा लवकर आलेला पूर, असा दुहेरी फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याची पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे आधीचे तयार पीक विकले गेले नाही.
आता नवीन आलेले पीक पुरामुळे नष्ट झाले आहे. राज्याचे कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव राजेश प्रसाद यांनी सांगितले की, आमच्याकडे पुराच्या पाण्यात टिकून राहणाºया पिकांच्या जाती आहेत. सुमारे १५ दिवसपर्यंत त्या पुराच्या पाण्यात तग धरू शकतात. तथापि, यंदा पूर नेहमीपेक्षा खूपच लवकर आला आहे. त्यामुळे नुकसान होणे अटळ आहे. पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज कळू शकेल. नेहमीपेक्षा यंदा नुकसान थोडे जास्त असेल, असा आमचा अंदाज आहे.
राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि अन्न प्रक्रियामंत्री अतुल बोरा यांनी सांगितले की, यंदा आसामातील शेतकºयांना मोठा फटका बसला आहे, यात शंका नाही. आधी कोविड-१९ लॉकडाऊनमुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. फळे व इतर पिकांचे सुमारे ४० कोटींचे नुकसान यात झाले असावे, असा अंदाज आहे. आता पुराचा तडाखा शेतकºयांना बसला आहे. पुरातील नुकसानीचा आकडा आताच सांगता येणार नाही. पूर ओसरल्यानंतरच त्याचा आढावा घेतला जाऊ शकेल.
उत्तराखंड, राजस्थानात पावसाचा इशारा
उत्तराखंड, उत्तर राजस्थानात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सॅटेलाइट छायाचित्रावरुन असे दिसून येते की, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, दक्षिण पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.