आमदार जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा अटक, काही वेळापूर्वीच मिळाला होता जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:24 IST2022-04-25T18:23:42+5:302022-04-25T18:24:51+5:30
Jignesh Mevani : आमदार जिग्नेश मेवाणी यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. सोमवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली.

आमदार जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा अटक, काही वेळापूर्वीच मिळाला होता जामीन
मुंबई : आसाम पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. जिग्नेश मेवाणी यांना त्यांच्या ट्विटशी संबंधित एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आसामच्या बारपेटा पोलिसांनी त्यांना आणखी एका प्रकरणात पुन्हा अटक केली आहे. जिग्नेश मेवाणीचे वकील अंगशुमन बोरा यांनी मीडियाला ही माहिती दिली आहे.
आमदार जिग्नेश मेवाणी यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. सोमवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली. पुन्हा अटक केल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांना कोक्राझार जिल्ह्यातून बारपेटा येथे नेण्यात येत आहे. आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या ट्विट प्रकरणी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना सोमवारी जामीन मंजूर केला.
कोक्राझार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भावना काकोटी यांनी त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे. सुनावणीनंतर मेवाणीला कोक्राझार तुरुंगात परत नेण्यात आले आणि त्यांच्या वकिलांनी सांगितले की जामीन बाँडशी संबंधित औपचारिकता पूर्ण केली जात आहे. मात्र आता त्याला आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
याआधी जिग्नेश मेवाणींना 19 एप्रिलला केली होती अटक!
दरम्यान, जिग्नेश मेवाणी यांना 19 एप्रिल रोजी गुजरातमधील पालनपूर शहरातून अटक करण्यात आली होती. कोक्राझार पोलीस ठाण्यात त्यांच्या एका ट्विटवर एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी गोडसे यांना देव मानतात. दरम्यान, आमदार जिग्नेश मेवाणी यांना ट्रान्झिट रिमांडवर कोक्राझार येथे आणण्यात आले होते आणि कोक्राझारच्या मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी 21 एप्रिलला त्यांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली होती.