आसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान, ५१ बळी
By Admin | Published: July 31, 2016 05:01 AM2016-07-31T05:01:52+5:302016-07-31T05:01:52+5:30
बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला
पाटणा/गुवाहाटी : बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील मृतांची संख्या २६ आणि आसामधील आकडा २५ आहे. दोन्ही राज्यांत धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या नद्यांचा फटका ४१ लाख लोकांना बसला आहे. केंद्र सरकारने आसाममधील पुरात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, बिहारबाबत केंद्राने असा निर्णय अद्याप घेतलेला नाही.
ओडिशामध्येही जोरदार पाऊस सुरू झाला असून, तिथे शनिवारी ठिकठिकाणी विजा पडून २९ जण मरण पावल्याचे
वृत्त आहे.
पिके भुईसपाट
बिहारमध्ये गंभीर पुरस्थितीचा पुर्णिया, किशनगंज, अरारिया, दरभंगा, माधेपुरा, भागलपूर, कथिहार, सहरसा, सुपौल आणि गोपाल या जिल्ह्यांतील २१.९९ लाख लोकांना तडाखा बसला. १.८३ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पाण्याखाली असून, ०.८३ लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेणे सुरू आहे. (वृत्तसंस्था)
>आसाममध्ये २१ जण मृत्युमुखी
आसाममध्ये पुराचे थैमान सुरूच असून, मुसळधार पाऊस
आणि फुगलेल्या नद्यांचा १९ लाख लोकांना फटका बसला
आहे. अरुणाचल प्रदेश आणि भूतानमधील संततधार
पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली.
लखीमपूर, गोलाघाट, बोंगाईगाव, जोरहाट, ढेमाजी, बारपेटा, गोलपारा, धुबरी, दरांग, मोरीगाव आणि सोनीतपूर या जिल्ह्यांना पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे, याशिवाय सिवसागर, कोकराझार, दिब्रूगड, गोलपारा, तिनसुकिया, बिस्वनाथ, नलबारी, बकसा, कामरूप (एम), चिरांग, कामरूप आणि दक्षिण कामरूप या जिल्ह्यांनाही झळ बसली आहे.
आसाममधील पुरात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज हेलीकॉप्टरमधून पूरपरिस्थितीची पाहणी केली. तेथील स्थिती भयंकर असल्याने, केंद्र सरकार आसामला संपूर्ण मदत करेल, असे ते नंतर म्हणाले.
>बिहारमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल
बिहारच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी ८,८५० बोटी तैनात करण्यात आल्या असून, ३.८९ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्य सरकारने विविध जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे प्रत्येकी एक पथक तैनात केले आहे.