“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:08 AM2024-05-22T11:08:50+5:302024-05-22T11:10:54+5:30
Assam CM Himanta Biswa Sarma News: नाना पटोलेंनी टीका करताना योगी आदित्यनाथांची तुलना रावणाशी केली होती.
Assam CM Himanta Biswa Sarma News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनीही नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना टीकास्त्र सोडले.
काँग्रेसच्या नाना पटोले यांनी टीका करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना रावणाशी केली होती. रावण सीता मातेला पळवून नेण्यासाठी भगवे कपडे घालून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येत आहेत. योगी आणि भाजपा नेते केवळ काँग्रेसवर टीका करत आहेत. मात्र देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर, चीनचे सीमेवरील अतिक्रमण, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर अवाक्षर काढत नाहीत, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला होता. याला हेमंत बिस्वा सरमा यांनी उत्तर दिले.
त्यांनी चीनच्या सीमेवर जावे अन् पाहून यावे
मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, चीनने भारताची कोणतीही जमीन बळकावलेली नाही. भारताच्या कोणत्याही भागावर चीनने अतिक्रमण केले नाही. नाना पटोले यांना असे वाटत असेल तर मी त्यांना चीनच्या सीमेवर घेऊन जायला तयार आहे. त्यांनी चीनच्या सीमेवर जावे आणि बघून यावे, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांना नैराश्य आले आहे. त्यातूनच अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडीला भगव्या रंगाचा द्वेष आहे. सनातन धर्माचा द्वेष आहे. काँग्रेसनेच भगवा आंतकवाद असा शब्द पुढे आणला होता. खरे तर पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर जनतेने आपल्याला नाकारले, याची जाणीव त्यांना झाली आहे, अशी टीका भाजपा प्रवक्ते मनिष शुक्ला यांनी केली.