"आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार", बालविवाहाविरोधात हिमंता सरकारची मोठी कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:33 IST2024-12-22T14:13:02+5:302024-12-22T20:33:58+5:30
बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत.

"आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार", बालविवाहाविरोधात हिमंता सरकारची मोठी कारवाई!
गुवाहाटी : आसामचे हिमंता बिस्वा सरमा सरकार बालविवाहाच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बालविवाहाबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची पोस्टही समोर आली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आसामने बालविवाहाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. काल रात्री सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात ४१६ अटक करण्यात आली असून ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार आहोत.
याचबरोबर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममधील लोकांची ओळख जपण्यासाठी आणि त्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे. तसेच, घुसखोरांचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी सरकार सीमांकनासाठी काम करत आहे. याशिवाय, राज्य सरकारने दहा हजार हेक्टर जमीन अतिक्रमणातून मुक्त केली आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करत राहील
याआधी १० डिसेंबर रोजी सोनितपूर जिल्ह्यातील जमुरीहाट येथे भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या स्वाहिद दिवस सोहळ्यात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते. त्यावेळी आसाम सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. तसेच, आसाम चळवळीत जात, माती आणि वारसा यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी श्रद्धांजली वाहिली होती.