आसाममध्ये महापूर! 444 गावे पाण्यात, IMD चा 5 दिवस 'रेड अलर्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:38 IST2023-06-20T13:37:48+5:302023-06-20T13:38:42+5:30
Assam Flood: पावसामुळे आसाममधील 10 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

आसाममध्ये महापूर! 444 गावे पाण्यात, IMD चा 5 दिवस 'रेड अलर्ट'
Assam Flood Situation: मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ईशान्येकडील आसाम राज्याला मोठा फटका बसला आहे. पुरामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आसाममधील 10 जिल्ह्यांतील सुमारे 31,000 लोकांना अजूनही पाण्याखालील भागात राहावे लागत आहे. मंगळवारी पूरस्थिती गंभीर झाली असून प्रशासकीय स्तरावरही मदत व बचावकार्य सुरू आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील 5 दिवस आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जवळपास 15 जिल्हे पुराच्या विळख्यात आले असून, 80 हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. राज्यातील चिरांग, दारंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, कोक्राझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे.
राज्याच्या हवामान खात्याने सांगितले की, सध्या राज्यातील 444 गावे पाण्याखाली आली आहेत. तसेच, पुरामुळे 4,741.23 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मातीची धूपही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मुसळधार पावसामुळे दिमा हासाओ, कामरूप महानगर आणि करीमगंजमध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.