आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 32 जिल्ह्यांना फटका, 25 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:29 AM2022-06-19T08:29:37+5:302022-06-19T08:43:35+5:30
Assam flood : राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचे पाणी ४,२९१ गावांमध्ये शिरले असून ६६४५५.८२ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे.
आसाममधील पूरस्थिती शनिवारी चिंताजनक पातळीवर पोहोचली. या पुरामुळे चार मुलांसह आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरातील मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. या वर्षी राज्यातील पूर आणि भूस्खलनात एकूण मृतांची संख्या ६२ वर गेली आहे. दुसरीकडे, इतर आठ जण बेपत्ता आहेत. होजई जिल्ह्यातून चार जण बेपत्ता आहेत तर इतर चार जण बजली, कार्बी आंगलाँग पश्चिम, कोक्राझार आणि तामुलपूर जिल्ह्यातून बेपत्ता आहेत.
राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचे पाणी ४,२९१ गावांमध्ये शिरले असून ६६४५५.८२ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. बारपेटा येथील जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, येथील ग्रामस्थ त्यांच्या घरात अनेक मौल्यवान वस्तू असल्याचे सांगून घरे सोडण्यास तयार नव्हते, परंतु आम्ही कसे तरी त्यांना घरे रिकामी करण्यास राजी केले. आता त्यांना छावण्यांमध्ये नेण्याची व्यवस्था करत आहोत. तसेच, पूरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे. नजीकच्या भूतानमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यालाही याचा फटका बसत असून येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
#WATCH Flood situation in Assam’s Chirang district remains grim with thousands of people affected
— ANI (@ANI) June 19, 2022
SDRF teams rescue more than 100 villagers. All the trapped people were shifted to safe places. (18.06) pic.twitter.com/IzQeAVJ0H2
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या ५१४ मदत शिबिरांमध्ये १.५६ लाखांहून अधिक बाधित लोकांनी आश्रय घेतला आहे. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोंगाईगाव, कछार, चिरांग, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा-हसाओ, गोलपारा, गोलाघाट, होजई, कामरूप, कामरूप (एम), कार्बी आंगलोंग पश्चिम, करीमगंज, कोक्राझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया आणि उदलगुरी हे बाधित जिल्हे आहेत.
Assam | Incessant rains in the past few days trigger mayhem in various parts; the flood situation in Kampur deteriorates further; villagers struggle to commute (18.06) pic.twitter.com/E51DaMVRUV
— ANI (@ANI) June 18, 2022
नलबारीतील एका पूरग्रस्ताने सांगितले की, गेल्या ३-४ दिवसांपासून आम्ही पुराच्या पाण्यात बुडत आहोत आणि आमची घरेही वाहून गेली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोणीही आमच्या मदतीला आलेले नाही. आम्हाला जेवण दिले जात नाही, गेल्या चार दिवसांपासून मी उपाशी आहे. दुसरीकडे, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आसाम पोलिसांच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांसह निमलष्करी दलांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे. पुराचा शेकडो घरांवर वाईट परिणाम झाला आहे आणि अनेक रस्ते, पूल आणि कालवे यांचे नुकसान झाले आहे, तसेच अनेक बंधारे फुटले आहेत. ब्रह्मपुत्रा, बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली आणि जिया-भराली नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.