Assam Floods : भीषण! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 9 जिल्ह्यांतील 34 हजार लोकांना फटका, 523 गावं पाणीखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 05:48 PM2023-06-21T17:48:48+5:302023-06-21T18:03:57+5:30
Assam Floods : सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.
आसाममधील अनेक ठिकाणी रात्रभर पडलेल्या पावसानंतर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या नऊ जिल्ह्यांमध्ये 34,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भूतान सरकार आणि भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत राज्याच्या वरच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील 'रेड अलर्ट' जारी केला आणि येत्या काही दिवसांत आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार' पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुवाहाटी येथील IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) मंगळवारपासून 24 तासांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, त्यानंतर बुधवारी 'ऑरेंज अलर्ट' आणि गुरुवारी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
एएसडीएमएच्या दैनंदिन पूर अहवालानुसार, बाक्सा, बारपेटा, दरांग, डिब्रुगढ, कोकराझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुरामुळे सुमारे 34,100 लोक प्रभावित झाले आहेत. लखीमपूरला सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे 22,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. यानंतर डिब्रुगडमध्ये सुमारे 3,900 आणि कोकराझारमध्ये 2,700 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
प्रशासन कोकराझारमध्ये एक मदत शिबिर चालवत आहे जिथे 56 लोकांनी आश्रय घेतला आहे आणि चार जिल्ह्यांमध्ये 24 मदत वितरण केंद्र देखील आहे.ASDMA ने म्हटले आहे की सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बारपेटा, सोनितपूर, बोंगाईगाव, धुबरी, डिब्रुगड, गोलाघाट, कामरूप, मोरीगाव, नलबारी, शिवसागर आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाल्याचे दिसून आले आहे. कछार, दिमा हासाओ आणि करीमगंजमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.