आसाम, गुजरात, हिमाचल भूकंपाच्या धक्क्याने हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:06 AM2020-07-17T02:06:23+5:302020-07-17T02:10:02+5:30
भूकंपाचा दुसरा धक्का दुपारी १.०९ वाजता पश्चिम आसाममध्ये कोकराझारमध्ये बसला. त्यामुळे मेघालयाचा पश्चिम भाग हादरला. यामुळे कसलीही हानी झाली नाही.
गुवाहाटी/अहमदाबाद : आसाम, गुजरात आणि हिमाचल प्रदेश गुरुवारी भूकंपाने हादरले. आसाममध्ये काही तासांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के बसले व त्यामुळे शेजारच्या मेघालयचा काही भागही हादरला. त्यात कसलीही हानी झाली नाही. बराक खोऱ्यात गुरुवारी सकाळी ७.५७ वाजता करीमगंज येथे रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यामुळे मेघालयातील शिलाँग व गारो हिल्स भागही हादरला. भूकंपाचा दुसरा धक्का दुपारी १.०९ वाजता पश्चिम आसाममध्ये कोकराझारमध्ये बसला. त्यामुळे मेघालयाचा पश्चिम भाग हादरला. यामुळे कसलीही हानी झाली नाही.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील उना भाग गुरुवारी पहाटे ४.४७ वाजता २.३ तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. किन्नौर जिल्ह्यात मागील आठवड्यात ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता.
ईशान्य भारत भूकंपप्रवण असून, येथे वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील एक महिन्यात मिझोराममध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहेत. त्यामुळे चम्फाई जिल्ह्यात नुकसानही झाले होते.
राजकोट हादरले : नुकसान नाही
- गुजरातच्या राजकोट शहराजवळील ग्रामीण भागाला गुरुवारी सकाळी ७.४० वाजता ४.८ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यामुळे कसलेही नुकसान झाले नाही.
- राजकोट शहरापासून दक्षिणेला २० किलोमीटर अंतरावर त्याचा केंद्रबिंदू होता. भूकंपानंतर मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी राजकोट, सुरेंद्रनगर व अमरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे, तसेच आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.