कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 02:07 PM2021-04-04T14:07:46+5:302021-04-04T14:10:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.
गुवाहाटी: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. मात्र, आसाममधील आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाच्या संदर्भात अजब विधान केले आहे. (himanta biswa sarma react on corona)
हेमंत बिस्वा सरमा यांना निवडणूक आयोगाने २४ तास प्रचार करण्यापासून रोखले आहे. मात्र, पत्रकारांशी संवाद साधताना सरमा यांनी अजब तर्कट मांडले आहे. कोरोना पळून गेला आहे. आसाममध्ये तरी मास्क घालण्याची काहीही गरज नाही, असा अजब दावा सरमा यांनी यावेळी बोलताना केला आहे.
चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक
गरज असेल, तेव्हा मास्क घालायला सांगू
आसाममधील नागरिकांना मास्क घालण्याची गरज नाही. मास्क घातल्यामुळे जनतेमधील भीती वाढली आहे. मास्क घालण्याची गरज असेल, तेव्हा शासनाकडून सांगण्यात येईल. मास्क घालून लोकं फिरायला लागले, तर ब्युटी पार्लर कसे चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आचारसंहितेचे उल्लंघन
हेमंत बिस्वा सरमा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत ४८ तासांपर्यंत निवडणूक प्रचार करता येणार नाही, असे निर्देश आयोगाने दिले. मात्र, याविरोधात सरमा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर आयोगाने प्रचार न करण्याचे निर्बंध २४ तासांवर आणले. तसेच आचारसंहितेचे पालन करण्याची हमी सरमा यांच्याकडून घेतली.
लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट
दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, ६० हजार ०४८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ५१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत देशात ०१ कोटी २४ लाख, ८५ हजार ५०९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, यापैकी एकूण ०१ कोटी १६ लाख २९ हजार २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७ कोटी ५९ लाख ७९ हजार ६५१ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.