Assam:सेंट्रल आणि स्पेशल जेलमधील 85 कैद्यांना HIV ची लागण, 'हे' आहे संसर्गाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 04:25 PM2021-10-10T16:25:03+5:302021-10-10T16:28:04+5:30
85 पैकी 45 विशेष कारागृह आणि 40 नागाव केंद्रीय कारगृहातील कैदी आहेत.
गुवाहाटी: असाम राज्यातील नागाव मध्यवर्ती(Nagaon Central Jail) आणि विशेष कारागृहात(Special Jail) सप्टेंबर महिन्यात 85 कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने ही धक्कादायक माहिती दिली. ही माहिती समोर येताच प्रशासनात खळबळ माजली आहे.
नागाव सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एल.सी. नाथ यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एचआयव्ही बाधित 85 कैद्यांपैकी 45 विशेष कारागृहातील आणि 40 नागाव मध्यवर्ती कारागृहातील आहेत. या सर्वांना अमली पदार्थांच्या व्यसनामुळे एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चार महिलांसह 88 लोकांच्या तपासणीत संसर्गाची पुष्टी झाली होती.
काय आहे संसर्गाचे कारण ?
नागाव जिल्हा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचआयव्ही बाधित कैद्यांमधील अनेकांना ड्रगचे व्यसन आहे. हे सर्व कैदी एकाच सुईचा वापर प्रतिबंधित औषधे घेण्यासाठी करत असतात, ज्यामुळे एकाचा आजार दुसऱ्यांपर्यंत जातो. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अनुराग गोयल यांनी सांगितले होते की, आसाम स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (ASACS) ने जारी केलेल्या आकडेवारीत, आसाममध्ये 2002 ते 2021 पर्यंत एकूण 20,085 HIV पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आकडेवारीनुसार, कामरुपमध्ये सर्वाधिक 6,888 एचआयव्ही रुग्ण आहेत, तर कचरमध्ये 4609 आणि डिब्रूगढमध्ये 1245 एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत.