उंदरांचा सर्जिकल स्ट्राईक; 12 लाखांच्या नोटा कुरतडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 10:55 AM2018-06-19T10:55:18+5:302018-06-19T10:55:18+5:30
12 लाखांच्या नोटा उंदरांमुळे 'कागज का तुकडा'
तिनसुकिया: आसामच्या तिनसुकियामध्ये एक अजब प्रकार घडला आहे. तिनसुकियाच्या लाईपुलीमधील एका एसबीआयच्या एटीएममध्ये उंदरांनी धुडगूस घातला आहे. या एटीएममधील तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशांविरोधात लढाईचा भाग म्हणून हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. 'यापुढे हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा कागज का तुकडा होतील,' असं त्यावेळी मोदींनी म्हटलं होतं. आता आसाममधील उंदरांनी नोटा कुरतडून त्यांना शब्दश: 'कागज का तुकडा' केलं आहे.
एसबीआयचं एटीएम तांत्रिक कारणांमुळे 20 मेपासून बंद होतं. याबद्दलची माहिती मिळताच कर्मचारी दुरुस्तीसाठी एटीएममध्ये आले आणि तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. याठिकाणी पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे तुकडे त्यांना दिसले. 19 मे रोजी खासगी सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएममध्ये 29.48 लाख रुपये भरले होते. यानंतर पुढच्याच दिवशी एटीएममध्ये तांत्रिक समस्या उद्भवली. यानंतर एटीएम बंद करण्यात आलं.
तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच 11 जूनला एटीएमच्या देखभाल दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्सचे कर्मचारी एटीएममध्ये आले. कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी एटीएम उघडलं. त्यावेळी त्यांना तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा कुरतडलेल्या अवस्थेत दिसल्या. या प्रकारासाठी काहींनी बँक आणि एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीला जबाबदार धरलं आहे. 20 मे रोजी एटीएममध्ये बिघाड झाला असताना, त्याची दुरुस्ती तब्बल 20 दिवसांनी का करण्यात आली, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.