मुले पळविणारे समजून दोघांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:47 AM2018-06-10T03:47:04+5:302018-06-10T03:47:04+5:30
आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.
गुवाहाटी - आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.
जिल्हा पोलीस अधीक्षक व्ही. शिवप्रसाद गंजाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या दोघांची नावे निलोत्पल दास व अभिजित नाथ अशी आहेत. दास अभियंता तर नाथ व्यापारी होते. दोघेही आसाममधीलच असून ते कांगथीलांगसो धबधब्याकडे चालले होते. पंजारी कचरी गावात स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मोटारीस गराडा घातला व बाहेर खेचून त्यांना बेदम मारहाण केली.
निलोत्पल दास गयावया करीत असूनही त्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला. गेले काही दिवस या भागांमध्ये मुले पळविणारी टोळी आली असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरविल्या जात होत्या. त्यातूनच गैरसमज होऊन या दोघांना ठार केले गेले असावे, असे पोलिसांना वाटते.
या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) मुकेश अगरवाल तातडीने करबी अंगलॉँग जिल्ह्यात रवाना झाले. समाजमाध्यमांत अशा अफवा पसरल्यापासून गेल्या काही दिवसांत सोनितपूर, पश्चिम करबी अंगलाँग व नागाव जिल्ह्यात अशाच प्रकारच्या इतरही घटना घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
पूर्वीही घडले
असे प्रकार
दोन वर्षांपूर्वी ब्रह्मपुत्रेच्या खालच्या खोºयात असलेल्या चिरांग, दारांग व सोनितपूर जिल्ह्यांत अशाच अफवांवरून झालेल्या हल्ल्यांमध्ये चौघांना ठार करण्यात आले होते.