आसामची NRC यादी वेबसाइटवरून गायब?, गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 02:11 PM2020-02-12T14:11:00+5:302020-02-12T14:12:19+5:30
आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती.
नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. यातच आता आसाम एनआरसीच्या डेटा संदर्भात वाद सुरू झाला आहे.
आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती. त्याचा सर्व डेटा अधिकृत वेबसाइटवरून गायब झाला आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, यावर आता गृह मंत्रालयाने उत्तर दिले आहे. एनआरसी संबंधित डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे डेटा वेबसाईटवर दिसत नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी आसाम एनआरसीचा डेटा गृह मंत्रालयाद्वारे http://www.nrcassam.nic.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये संपूर्ण यादी होती. मात्र, अचानक हा डेटा हटविण्यात आला आणि वेबसाइट सुद्धा सुरू होत नव्हती. यानंतर, अनेक अफवा पसरू लागल्या आणि यासंदर्भात गृह मंत्रालयाकडे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व अफवा दूर करत एनआरसीचा सर्व डेटा सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच, वेबसाईटवर क्लाउडच्या कारणास्तव डेडा दिसू शकत नाही. हा बिघाड लवकरच दुरुस्त करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
एनआरसीचे राज्य कॉर्डिनेटर (समन्वयक) हितेश देव शर्मा यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "सध्या डेटा ऑफ लाइन करण्यात आला आहे. मात्र, ही चूक तांत्रिक कारणामुळे झाली आहे. वेबसाईटच्या क्लाउड सर्व्हिसची जबाबदारी आयटी फर्म विप्रोकडे देण्यात आली होती. पण, ती ऑक्टोबर 2019 पर्यंत उपलब्ध होती.
याचबरोबर, हितेश देव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील कॉर्डिनेटरने यंत्रणा अपडेट केली नव्हती. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी विप्रो कंपनीने ही सुविधा बंद केली. दरम्यान, राज्य समन्वय समितीने आता यावर काम करण्यास सुरुवात केली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विप्रो कंपनीला यासंदर्भात अधिकृत सूचना देण्यात आली आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत वेबसाईटवर हा सर्व डेटा दिसून येईल.
दरम्यान, आसाममध्ये गेल्या वर्षी एनआरसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ज्यामध्ये 19 लाख लोक यादीतून बाहेर झाले होते. 31 ऑगस्ट 2019 रोजी सरकारकडून एनआरसीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये आसाममधील एकूण 3,30,27,661 लोकांपैकी 3,11,21004 नागरिकांची नावे आली होती. तर 19,06,657 लोक एनआरसीच्या यादीतून बाहेर झाले होते.