Assam NRC Draft: सोनिया गांधींनी अवैध बांगलादेशींना केली होती मदत; विकिलीक्सचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 05:59 PM2018-08-02T17:59:31+5:302018-08-02T18:03:55+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी बलाढ्य राष्ट्रांची गुपिते उघड करणारा विकिलीक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपूर्वी बलाढ्य राष्ट्रांची गुपिते उघड करणारा विकिलीक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता विकिलीक्सनं भारतातल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीच्या मुद्द्यावर धक्कादायक खुलासे केले आहेत. 16 फेब्रुवारी 2006ला अमेरिकी कॉन्स्युलेटचे अधिकारी केबल यांनी विकिलीक्सला पाठवलेल्या माहितीतून हा गौप्यस्फोट झाला आहे.
2006च्या आसाम विधानसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींनी अवैधरीत्या भारतात राहणा-या मुस्लिमांचा बचाव केला होता. परराष्ट्र कायद्यात दुरुस्ती करणार असल्याचंही त्यावेळी सोनिया गांधींनी जाहीर केलं होतं. जेणेकरून मुस्लीस शरणार्थी कायमचे भारतात राहू शकतील. परंतु 2005मध्ये सर्वोच्च न्यायालयानं आयएमडीटी कायद्याला असंवैधानिक घोषित केलं होतं. खरं तर या कायद्यामुळे बाहेरून आलेल्या बांगलादेशींची ओळख पटवून त्यांना परत पाठवणं अवघड झालं आहे. काँग्रेसनं नेहमीच बाहेरून आलेल्या बांगलादेशी शरणार्थींचं समर्थन केलं आहे. या आयएमडीटी कायद्यामुळेच 1971नंतर बांगलादेशींना भारतात आश्रय मिळत राहिला आहे.
केबल म्हणाले, काँग्रेसनं कायमच मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधींनी या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्नही केला होता. आसाममध्ये काँग्रेस पक्षाचे 13 आमदार मुस्लिम आहेत. काँग्रेस पक्ष वारंवार मुस्लीम शरणार्थींचा बचाव करत आला आहे. त्यामुळे मुस्लिमांचा कल नेहमीच काँग्रेसकडे असतो. आसाममधल्या काँग्रेस पक्षाचे माजी खासदार किरीप चलिहा म्हणाले, माझ्या लक्षात नाही सोनिया गांधी त्यावेळी काय बोलल्या होत्या. परंतु मी कधीही बाहेरून आलेल्या शरणार्थींचं समर्थन केलेलं नाही. हा मुद्दा हिंदू आणि मुस्लिमांचा नव्हे, तर शरणार्थींचा आहे. शरणार्थींमुळे देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. एकंदरीतच काँग्रेसनं केबल यांच्या आरोपावरून हात झटकले आहेत.