या राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले, पेट्रोल-डिझेल तब्बल पाच रुपयांनी स्वस्त झाले
By बाळकृष्ण परब | Published: February 12, 2021 04:01 PM2021-02-12T16:01:53+5:302021-02-12T16:02:00+5:30
petrol-diesel Price News : पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले किंवा स्थिरावले की निवडणुका जवळ आल्या असे समजून जावे, असे आपल्याकडे म्हटले जाते.
गुवाहाटी - पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले किंवा स्थिरावले की निवडणुका जवळ आल्या असे समजून जावे, असे आपल्याकडे म्हटले जाते. याचाच प्रत्यय आसाममध्ये येत आहे. आसाममध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक (Assam Assembly Election 2021) होणार आहे. मात्र निवडणुकीला काही महिने असतानाचा राज्यात पेट्रोल आणि मद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे. नवे दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. आसाम सरकारने आज याबाबतची माहिती दिली आहे. (In Assam petrol-diesel has become cheaper by five rupees)
पेट्रोल-डिझेल आणि मद्याचे दर कमी करण्याचा निर्णय हा विधानसभा निवडणुकीला महिनाभराचा अवधी असताना घेतला गेला आहे. या निर्णयानुसार आसाममध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर मद्यावर आकारण्यात येणारा करही २५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. आसामचे वित्तमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी या निर्णयाची विधानसभेत घोषणा केली.
कोविड-१९ चा फैलाव शिखरावर असताना पेट्रोल-डिझेल आणि मद्यावर अतिरिक्त सेस आकारण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी होत आहे. त्या पा्र्श्वभूमीवर कॅबिनेटने आज सकाळी अतिरिक्त सेस हटवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपये प्रति लिटरने स्वस्त होईल. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगाने वाढत आहेत. मात्र यापूर्वी सुमारे एक महिन्यापर्यंत या किमतीत काहीही बदल झालेला नव्हता. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा प्रभाव घरगुती बाजारावरही पडत आहे. जगभरातील विविध भागात कोविड-१९ च्या लसीकरणामुळे तेलाची मागणी वाढली आहे.
आसाममध्ये एप्रिल-मे महिन्यादरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आपली राज्यातील सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे.